स्वरूपा रावलच्या कविता

जन्मदिनांक : २४  एप्रिल १९७५.

स्वरूपा रावल गुजराथी कवयित्री आहे. ती पूर्णवेळ गृहिणी आहे. वाचन आणि विविध पाककृती बनवणे हे तिचे छंद आहेत. तिचं शिक्षण बी.ए. पर्यंत झालेलं आहे. सध्या वास्तव्य वडोदरा इथे. एका अपघातात गंभीर अपंगत्व आल्यानंतर मिळालेल्या सवडीच्या काळात तिने खूप उशिरा कविता लिहिण्यास सुरुवात केली. तिने स्वत:च हिंदीत अनुवादित केलेल्या कवितांवरून मी हे अनुवाद करते आहे. अनुवाद जसजसा करून होईल तसतशा तिच्या अजून काही कविता इथे देईन.

१. अर्धविधवा

अर्धी विधवा झोया सैरभैर होती आशेने
की सापडेल नवरा सात वर्षांच्या आत

अर्धी विधवा श्यामा गुमसुम गुपचूप
कोमात गेलेल्या नवऱ्याकडे बघत
आणि वीरादेखील कूस बदलत
अर्धांगवायू झालेल्या नवऱ्याची
त्याला बेडसोअर्स होऊ नयेत आणि
थांबावं तिचंही लाखवेळा तळमळत
कूस बदलणं चादर चुरगाळत

अर्धी विधवा जसोदा आहे
पूर्ण कुमारिका अजून
नवरा सोडचिठ्ठी न देताच गेला
पळून देशसेवेच्या बहाण्याने

अर्धी विधवा
ही ती
ती ही
हीही तीही तीही आणि तीही
कितीही न मोजलेल्या अर्धविधवा

हरवलेले, पळून गेलेले,
सोडून गेलेले, अर्धे जिवंत असलेले
पूर्ण मेलेत की नाही माहीत नसलेले
आमचे नवरे
भेकड भेदरट पळपुटे कुणी
नपुंसक निलाजरे कुणी
कुणी धाडसी सीमेवर हरवलेले
कुणी बलवंत आशावादी परतू पाहणारे

अर्धविधवा पाहतात वाट
निकालाची न्यायाची
मोकळ्या होतील बांगड्या फोडून
किंवा कपाळावर झळकवतील
लालबुंद सूर्यबिंब

अर्धविधवांना मिळत नाही न्याय
जरी त्यातल्या एखादीचा नवरा
देशाचा पंतप्रधान बनला तरीही.

२. गुजराथमध्ये

फक्त डोळेच तर फोडलेत ना
त्यात इतकं किंचाळण्यासारखं
काय आहे बाबा?
नाहीतरी गुजराथमध्ये आता तुला
बघण्यासारखं
काय आहे शिल्लक?

हां… काही गोष्टी करता येतील…
जळक्या घराचा वास घेता येईल
नाक कुठे कापलंय तुझं?
नुसत्या बोटांच्या टोकांनी स्पर्श करून
रक्ताचं थारोळं कळेल तुला
त्वचा कुठे सोललीय तुझी?
तुझी सगळी माणसं छाटली
आता रिकाम्या आभाळाखाली
सनसन वाहणारे वारे ऐकता येतील
कान चिरले नाहीत तुझे.

अजून काय करायचं आहे तुला
गुजराथमध्ये?

३. रानफुलं 

तलवारीच्या धारेने
रानफुलं छाटली
पांढरी लाल
जांभळी पिवळी
तरी रक्त नाही आलं
एकाही देठातून
एकही किंकाळी
पाकळीतून
ऐकू आली नाही
म्हणून तुम्ही दु:खी

दु:खी शूरवीरांनो
आता नीट पहा
साध्या दवाने
गंजली आहेत
तुमची पाती
आणि आता
मैदान मारून
परतताना
पुन्हा दिसतील
फुललेली
नवी रानफुलं.

४. लाल मुंगीला समजलं 

एका लाल मुंगीला समजलं
हे मरताहेत सगळे
ती आली हातावर चढून एकाच्या
दंडावरून पुन्हा उतरत गळा
हनुवटीवर येऊन थांबली

मी फक्त पाहिलं तिच्याकडे
आणि तिने माझ्याकडे
पाचोळ्याखाली अजून थोडे किडे
जमले होते

सगळे आप्तस्वकीय
जमले म्हणायचे
शेवटच्या निरोपाला
पण त्यांचा धर्म कोणता
हे आधी विचारलं पाहिजे.