त्यांच्या कविता

देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांनी लिहिलेल्या एकूण १८ कवितांचा  अनुवाद इथे देत आहे.
या कवितांची भाषा मिश्र होती. रचनेवर किरकोळ संस्कारही केले आहेत, अर्थात आशयाला धक्का लागू न देता.

कवयित्री आहेत : चिन्नाक्का ( ४ कविता ), शांता ( ३ कविता ),  चंद्रिका ( ५ कविता ), गुलाब ( २ कविता ), प्रेमला ( ४ कविता ).


चिन्नाक्का
——–

1.

आता तो
हस्तमैथुन करतानाही
धापा टाकतो
इतकं दुबळं बनलंय
त्याचं हृदय
प्रेमामुळे, तुझ्यामुळे
तू असं त्याच्या तोंडावर
दार आपटून
बंद करायला नको होतंस!
– त्याचा दोस्त म्हणवणारा
म्हणाला असं
आवाज कनवाळू करत
धंद्याच्या टायमाला

मग ब्ल्यू फिल्म पाहून तर
जोराचा हार्टअटक येवून
मरायलाच पाह्यजे होत्ता तो
आजपस्तोर निदान
बाराशे वेळा –
मी हासून म्हणाले
आणि विचारलं
बसणार आह्येस का तू
आसतील पैसे तर?

शेपूट आणि कनवाळूपणा
दोन्ही गांडीत घालून घेऊन
पळत सुटला
त्याचा दोस्त म्हणवणारा.
००

२.

आम्ही कपडे पाहतो
तुम्ही कातडी पाहता
इतकाच फरक

००

३.

पृथ्वीचा फोटो काढला चंद्रावरून
तर खूप डाग दिसतील
ते आम्ही नाहीत
तुम्ही आहात!

००

४.

खूप घाण साचली आहे
सगळं जग नरक झालंय
आणि सगळे जीव
निव्वळ किडे

००

2.  शांता

१.

म्हातारी लिलू म्हणते
किती लिंगं बघितली मी आयुष्यात
जितकी नसतील या प्रुथ्वीवरती शिवलिंगं
मंदिरांमध्ये
धाकट्या भावाची इवलुशी नुन्नी
पाळण्यातून शूचं धनुष्य करणारी
आणि सावत्र बापाचा वरवंट्यासारखा बुल्ला
एकाच वयात मला माहीत झाला…
म्हातारी लिलू म्हणते…

००

२.

म्हातारी लिलू म्हणते
इथं मुलगी जन्मू नये, धंद्याला लावतात
इथं मुलगा जन्मू नये, दल्ला बनतो
इथं हिजडा जन्मू नये, भीकेला लावतो गुरू
पण आपलं कोणीतरी पाह्यजे ना दुनियेत
म्हणून हा कुत्रा पाळला…
म्हातारी लिलू म्हणते…

००

३.

म्हातारी लिलू म्हणते
पाट्यावर वाटलेल्या उडदाचे वडे
किती चवदार लागतात
आणि घरचा नारळ खवलून त्यात
परसातल्या मिरच्या खुडून घालायच्या
चटणी वाटायची दुधाळ
भरपूर कढीपत्ता घातलेली खमंग फोडणी
आजकाल नाकाला सगळे जुने वासच येतात
लहानपणीचे…
म्हातारी लिलू म्हणते…

००

 3चंद्रिका

 

1.
आधी प्रेत म्हणून जन्मायचं
कपाळावर लाल मळवट
देहावर हिरवी चिंधी पांघरून
सरणावर झोपायचं
वाट पाहायची पेटवण्याची
धाडधाड आग भडकेल
ताडकन फुटेल कवटी
वाट पाहायची

पण ओततच नाही कोणी रॉकेल
म्हणून डोळे उघडून पाह्यलं
तर वेगळंच सरण
लाकडांसारखे रचलेले खाली
पुरुष
दोन्ही बाजूंना पुरुष वरती पुरुष
मग जळण्याची रीत रद्द
मरण्याची रीत रद्द
तरीपण जगायचं
तरीपण जळायचं
धगधग आग धकधक दिल
खिसा कर उलटा
मी कुलटा तर कुलटा

प्रेताची भीती वाटली नाही
की जित्याचीही भीती
वाटत नाही
००

२.

त्यांच्याकडे थोडे पैसे असतात
आणि एक उपाशी लिंग असतंय
मनात फक्त नाईलाज असतोय
बाकी काही नसतंय
ना दया ना प्रेम ना आकर्षण ना माणुसकी

आमच्याचसाठी नसतंय असंही नाहीये
घरच्यांसाठी जरी असतं
तरी ते इथं दिसले नसते
आणि ते आलेच नसते आमच्याकडे
पैसे, लिंग आणि नाईलाज घेऊन
तर आम्हीही इथं दिसलो नसतो.

००

३.
काल चार गिर्हाईकं आलती
आज अजून एकावरच अडलंय
तो एक उतरला
समोर साईबाबाच्या फोटोला
झाकलं होतं पँट लटकावून
ती अडकवली पायांत
चेन वर खेचून साईबाबाला
पुन्हा नमस्कार केला
आल्यावर केलताच दचकून

पँटमधून साईबाबाला दिसत असंल काय?
मी विचारलं तर जास्तीच दचकला
शर्ट तर काढलाच नव्हता
तो नीट इन केला
पँटच्या खिशातल्या पाकिटातनं पैसे दिले
साईबाबाला पैशांनी काही दिसलं नसंल काय?
० ०

४.
आधी एकेका रात्रीत सात-आठ गिर्हाईकं यायची
सिझनला तर दहा-बारा
वर्षभरात कमी झाली
आता तीन-चार
सिझनला एखादं जास्ती
येतात चढतात उतरतात जातात
मी कधी कोणाचं नाव विचारत नाही
कोणी कधी माझं नावगावफळफूल विचारत नाही

गावात एका रात्रीत सोळा चढले होते
रांग लावून
मग इकडं विकलं मला सोळातल्या पहिल्यानं
अजूनही येतो कधी फुकट चढायला
मुद्दाम सांगतो गावातल्या बातम्या
घरातल्यासुद्धा

गावात आमच्यांची तीन घरं होती
त्यांच्यांची बावीस
दोन मोठे रस्ते अठरा गल्ल्या तीन दुकानं
एक शाळा
सत्तावीस नक्षत्रांची नावं घडाघडा सांगितली
तेव्हा सर म्हणाले होते शाब्बास
गणितात पहिली आलते सातवीला
० ०

५.
काही दिसत नाही
मला कोणाचा चेहरा दिसत नाही
कोणाला माझा चेहरा दिसत नाही

एक गेला की दुसरा येण्याआधी
मी टॉवेलनं मांड्या पुसते नुसती
ओल दिसत नाही तरी असतेच

काही आठवत नाही सकाळी
न दिसलेलं
पैसेही आता अम्मा दारातच घेते
आधीच

मग पडायचं असतं उलथं नुसतं
आता वासही येत नाहीत नाकाला
ना जिभेला चव

सकाळी कपडे घालावे लागतात
हागायला खोलीतून बाहेर जायचं म्हणून
साडीच्या टिकल्या चमकतात

डोळे दुखतात उजेडानं

००

 ४गुलाब

1.
बेंदाड भूत
लागली लूत
अत्तरमारीचा
उप्योग नाहीय्ये

गटार साफ करून आला तर
बायको घेत नाही उरावर
आणि मला काय
नाहीये नाक?

उलथ इथून
बेंदाड भूत

००

२.

तो खोटारडा म्हणालेला
की तो शाकाहारी आहे
त्यानं खाल्ले माझे ओठ चावून चावून
पिलं माझ्या डोळ्यांतलं रक्त
उठलं नाही त्याचं तर
अपयशानं संतापून
मारल्या बुक्क्या माझ्या मांड्यांमध्ये
खुपसली बोटं कचाकचा
टोचवली घाणेरडी नखं
म्हणाला, तो कधीच
वापरत नाही कण्डोम
बायकोनेही नऊ वेळा पोट पाडलंय
तिच्या भोकाचं भगदाड झालंय
म्हणून इथं येतो
तर काहीच जमत नाही इथल्या
घाणीत
कर प्रयत्न आणि आताही नाही उठलं
तर जीव घेईन तुझा!

मांसाहारीच असतात
शाकाहारी म्हणवणारे देखील.

००

 प्रेमला

१.

मी कुसळय कुसळ… तुझ्या डोळ्यात घुसीन
मी मुसळय मुसळ… तुझा इगो ठेचीन
उखळाचा रोल करून करून
मी बोअर झालेय
जमिनीत गाडून घेऊन एकाचा कोपऱ्यात
मी बोअर झालेय

मी जाईन पळून कांडणारे हात घेऊन
कांडणाऱ्या हातांना सुद्धा आता
बोअर झालंय

सगळी मुसळं मसणात जाळा
कांडणारीचा देह काळानिळा
कोणी द्यावा कोणाला हात
आपल्याच साळी आहेत उखळा
गुपचूप व्हायचं दाढेखालचा भात

तरी म्हणायचं कांडताना गाणं
मी कुसळय कुसळ…

००

२.
गुपचूप गरोदर राहीन
उकंड्यावर बाळंत व्हईन
गंजक्या ब्लेडने कापीन नाळ
पोरगा जल्मला तर भडवा बनवीन
पोरगी जल्मली तर धंद्याला लावीन
पळून गेली पोरं वस्तीतून
बनली कोणी मोठी सायेब
तरी तुझं नाव लावणार नाहीत
तुला नसेल पत्ता तुला नसेल मालुमात
आणि तुझा वंश धंदा करेल गंदा
हीच तुझी सजा
मजा मारून विसरून गेल्याची

००

३.

तुला लाज नाही वाटत का? तिनं विचारलं
आणि झर्रकन मान फिरवली
आमच्यासारखी असती तर थुंकलीही असती
मी तिला नीट खालून वर बघितलं
मग वरून खाली बघितलं
बघितलं की लाजेनं बाईचं काय व्हतंय?

लाजत लाजत लग्न करायचं
लाजत लाजत कपडे घालायचे
लाजत लाजत कपडे काढायचे
लाजत लाजत पोट वाढवायचं
लाजत लाजत बाळंत व्हायचं
लाजत लाजत लेकराला पाजायचं
लाजत लेकीला लाजायला शिकवायचं
लाजत लाजत जेवायचं नवऱ्याच्या उष्ट्या ताटात
लाजत लाजत नोकरी करायची
लाजत लाजत सगळी कमाई घरात द्यायची
लाजत लाजत लपवायच्या खालेल्या शिव्या आणि मार
लाजत लाजत म्हातारं व्हायचं
लाजत लाजत दुखणं सोसायचं
लाजत लाजत मरून जायचं

मी म्हटलं तिला शेवटी
तुझा निर्लज्ज नवरा येतो माझ्याकडे
पण माझ्याऐवजी
त्याला विचारशील का जाब
की लाजशील अजून?
००

४.

मला सोडायचं तर कोर्टात
जावं नाही लागणार
मला सोडायचं तर पोटगी
द्यावी नाही लागणार
मला सोडायचं तर दु:ख नाही
मुलंबाळं दुरावल्याचं
मला सोडायचं तर अडणार नाही
घरसंसाराचा गाडा

मला सोडलं तर
वाचतील थोडे पैसे
खुश होईल लग्नाची बायको

फक्त मीच म्हणू शकते –
ना मी तुला धरलं होतं
ना तू मला धरलं होतं
मग सोडणार कोण कोणाला?
कोणाची सुटका होईल कोणापासून?
जाय जायचं तिकडं!
००

Advertisements

माया अकोटकरच्या कविता

जन्मदिनांक : १८ मे १९८९

मायाचे वैद्यकीय शिक्षण अधुरे राहिले, मात्र नंतर तिने एल. एल. बी. आणि एम. एस. डब्ल्यू. पूर्ण केले.

पीडित स्त्रियांच्या संस्थेत उपचारांचा भाग म्हणून डॉक्टरांनी डायरी लिहिण्यास सांगितले, तेव्हा मायाने आपण आधीपासून कविता लिहीत असल्याचे सांगितले. कवितांची डायरी तिच्यासोबत सर्व संघर्षात, धावपळीत सुखरूप होती. लेस्बियन असल्याचे घरच्यांना समजल्यावर माया आणि तिची मैत्रीण सुजाता या दोघींनाही त्यांच्या घरच्यांनी मारहाण करून कोंडून ठेवले. काही दिवसांनी ‘सुधारण्याचे’ आणि ‘घरचे सांगतील तसे वागण्याचे’ वचन देऊन त्यांनी पुन्हा कॉलेजला जाण्यास सुरुवात केली. मात्र सुजाताच्या लग्नाचा विचार सुरू झाल्यावर त्यांनी घरातून पळ काढला. दोघी १८ हून अधिक वयाच्या, सज्ञान होत्या. पण पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. ही विकृती मानून त्यांना संस्थेत दाखल करण्यात आले; तेव्हा दोघींच्याही शरीरावर गंभीर जखमा होत्या. संस्थेत त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि सहाय्य लाभले.

या सगळ्या त्रासातून गेल्यानंतर देखील मायाच्या कवितेत कुठेही कडवटपणाचा, नैराश्याचा अंश नाही. अत्यंत उत्कट प्रेमकविता आणि साध्या-सुंदर  निसर्गकविता ती लिहीत राहिली आहे. कविता म्हणून त्या काय दर्जाच्या आहेत, हा मुद्दा नंतरचा. जगण्यासाठीचा साध्या माणसांचा संघर्ष आणि सकारात्मक दृष्टिकोन या कोनातून मी मायाच्या कवितेकडे पाहते.

e mail : maya.akotkar@gmail.com


१.

गवताची हजार पाती
त्यावर दोघी
पहुडलेल्या

संथ वारा
मनात धाप
शब्द सुचेना

कुणी बोलावे?
तू की मी?
काय नेमके?

दोघींच्याही
वक्षावरती
उन्ह घोटाळे

उन्हात हसलो
आणि रडलो
बिलगलो

गवताची हजार पाती
नाचती
नाचती

०००

२.

प्रेम बनलं गुन्हा
मी तिच्यावर
केलं म्हणून
ती धर्मातली
जातीतली
पोटजातीतली
सुंदर
सुशिक्षित
श्रीमंत घरातली
माझ्यासारखीच
तरी ती ‘ती’ होती
‘तो’ नव्हती
म्हणून
गुन्हेगार दोघी
जमिनीला
पाठ टेकवून
आभाळाकडे
बघत
विचारत राहिलो
प्रश्न
मूकपणे
पक्ष्यांना
तर त्यांना
स्त्री पुरुष लग्न
हे शब्दच
नव्हते माहीत
पक्ष्यांना
माहीत नव्हत्या सीमा
आम्हीही पुसून टाकली
निरुपयोगी
माहिती
मेंदूतून

०००

३.

दिवस बदलतील
जसे ओघळतील
स्तन पोटावर
वृद्धपणी

तसाच तुझा
सरेल ताठा
तुझ्याकरिता
नुरेल कुणी

कसा करशील
सगळा प्रवास
सोबतचे शरीर
तुझ्यावाणी

घालता भीती
देता धमक्या
आणि म्हणता
करतो राखणी

जिथे प्रेम
तिथे नांदू
म्हणत हसलो
दोघीजणी

०००

४.

झाडाकडे पाहिलं नुसतं
आणि पानं उडून गेली
हजारो भुंगे बनून
गुणगुणत गुणगुणत

फुलं गळली नुसती
जसा मध गळावा
सोनेरी पोळ्यातून
टपटपत टपटपत

गोड वास सगळीकडे
मधुर मधुर मध
जीभ फिरताना
आतून बाहेरून

माळावर उघडा
काळा कातळ
झाला जांभळा
रंग बदलून

०००

५.

पांगाऱ्याची फुलं
केसांत माळायची
तर म्हणे आधी
उन्ह नेसून ये
अट आहे समज…

मीही म्हणाले
माझा निखारा
जिभेवर ठेवायचा
तर सगळे शब्द
विसरून ये
अट आहे समज…

माझ्या कानाची
पाळी तापून लाल
त्याचे डोळे खुळे
शांत खोल निळे
अटी गेल्या जळून
आग घेतली पिऊन…

०००

६.

ओठांत अमृत नसते
की अमर व्हावं
एक थेंब पिऊन
असते मदिरा
की पित राहा
हो व्यसनाधीन
मरून जा
मरताना आठव
चुंबन!

०००

७.

पाच पाकळ्यांमध्ये
परागाच्या देठाखाली
अंधारात
जिथं गडद गडद होतो
जास्वंदीच्या पाकळ्यांचा
लाल रंग
काळसर लाल
तिथं
मी टेकवेन जिभेचं टोक
घेईन चोखून.

०००

८.

उंच
पाईनच्या
झाडांमधून
फिरताना
पायांखाली
लाखो सुया
काही हिरव्या
काही पिवळ्या
सुयांवरून
घसरून
पडलो
तर
दंशच दंश
देहभर
धरून चालू
एकमेकींना
घट्ट.

०००

९.

मी तुझ्याशी खोटं बोलेन
आणि चोखेन
तुझ्या ओठांतला निखारा
बर्फासारखा.

०००

१०.

जंगलातून फिरताना
झालो हिरव्या जंगली
तुझ्या देहावरची ही
हिरव्या कवडशांची नक्षी
मी कशी लिहू?

०००

११.

खूप पाऊस कोसळतो
म्हणता येत नाही थांब
कडाडून वाजते थंडी
तिला ढकलता येत नाही दूर
घशात टोचते किंकाळी
तिला कशी रोखू?

… लवकर ये तू.

०००

शगुफ्ताची कविता – ३

तलाक मिळून माहेरी परतलेल्या
नणंदेसारखी सकाळ
गोरी, देखणी आणि चिडचिडी
विचारलं, ‘काय नाश्ता बनवू?’ तर म्हणते,
‘बनव, काही येत असेल बनवता तर!’
नाही विचारलं, तर म्हणते,’ अदब नाही.
विचारून करण्याची रीतभात
हिला हिच्या आईने शिकवली नाही.
साधा पाव्हण्यांचा आदरसत्कार जमत नाही. ‘
मोलकरणीला म्हटलं,’स्वच्छ झाड गेस्टरूम’
ऐकून म्हणे,’पाहुणी नाही मी
माझ्या भावाचं घर आहे, तू तर मागून आलेली.’

सकाळ बोचकारत राहते शेजाऱ्यांच्या
पांढऱ्या मांजरीसारखी
तरी शेजारधर्म म्हणून मी देते तिला वाडगाभर दूध

सूर्य तापेल आकाश लाल होईपर्यंत
मग आदळेल काळोख धपकन
‘भुसा भरलेले पराठे खाऊ घालते वहिनी,’
जेवताना कुरकुरेल रात्र
‘स्वयंपाकघरातच निजणार आहेस का?’
खेकसेल नणंदेचा भाऊ येरझारा घालत

 

उजेडाआधी उठून, डोक्यावर गार पाणी ओतत न्हाऊन
मी घुसेन पुन्हा स्वयंपाकघरात
आळसावत जागी होऊन मागाहून आत आलेली सकाळ
न्याहाळेल पुन्हा मला जळजळीत नजरेने नखशिखान्त
माझे ओलेते केस पाहून मत्सराने पुटपुटेल,
‘तमीज नाही हिला जराही!’

 

वेदिका कुमारस्वामीच्या कविता

जन्मदिनांक : १३ जुलै १९८६

वेदिकाचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून सध्या ती कोल्हापूर जिल्ह्यात एका सामाजिक  संस्थेत एक वर्षाचे  लघुउद्योगाचे प्रशिक्षण घेते आहे. पीडित स्त्रियांना संस्थेत उपचारांचा भाग म्हणून डॉक्टरांनी डायरी लिहिण्यास सांगितले, तेव्हा अचला, वेदिका आणि मंजुषा या तिघींनी कविता लिहिल्या.  वेदिका द्वैभाषिक असल्याने तिच्या काही कविता कन्नड आणि काही कन्नडमिश्र मराठीत होत्या. अश्विनी दासेगौडा – देशपांडे या कन्नड व मराठी दोन्हीही चांगले जाणणाऱ्या मैत्रिणीसह, कवयित्रींसोबत बसून मी हे अनुवाद केले आहेत. ते टप्प्याटप्प्याने इथे देण्यात येतील.

आता तिच्या पुस्तकाचे संपादन सुरू आहे; तथापि तीही अजून काही लिहून भर घालते आहे. देवदासींच्या आयुष्याची कथा तुकड्या-तुकड्याने तिने या कवितांमधून सांगितली आहे. मागासवर्गातून आलेल्या देवदासी या देवळात स्वच्छता इत्यादी कामे करतात आणि नृत्यादी कलांमध्ये पारंगत असलेल्या देवदासी एखाद्या श्रीमंत पुरुषाने ठेवलेली बाई म्हणून राहतात. अशा कलावंत कुटुंबातील एका मुलीची झालेली वाताहत या कवितांमधून उलगडत जाते.

जुनी कथाकाव्ये अथवा लोककथागीते असावीत, तशी धाटणी या कवितांची आहे. एका चक्रातून भिरभिरत त्या पुन:पुन्हा त्याच त्याच जागी येत आलटून पालटून कथेचे अंश तुकड्यातुकड्याने  सांगतात. त्यामुळे काहीवेळा पुनरावृत्तीचा आभास निर्माण होतो, तरी ते तुकडे नीट जुळवून पाहिले तर पुनरावृत्ती जाणवत नाही. असा पुनरावृत्तीचा आभास लोककथागीतांमधून आढळत असतो.

संपादनानंतर पुस्तकाच्या प्रस्तावनेत विस्ताराने या कवितांची वैशिष्ट्ये आणि त्यातल्या त्रुटी यांविषयी लिहीनच.

e mail : vedhickakumarswami@gmail.com


 

पूर्वार्ध

१.

हेगडे मला म्हणतेला रांडे तुजी अवकात काय्ये
हेच्च मला आठीवलं सेम प्रश्न
आज्जीला नवऱ्यानं विचारलाता
सेम प्रश्न अम्माला पुजाऱ्यानं विचारलाता
हेगडेला चढतेली दारू मला दिसतेली  लाल नेत्रांनी
हेगडे लाल दिसतेला पेटलेल्या चितेसारका
हेगडे जळतेला निसताच प्रेताशिवायची चिता
हेगडे सुक्का लाकूड प्रेमाशिवाय जळतेला
हेगडे जळतेला निसताच प्रेमाशिवाय
हेगडेला प्रेम भेटलंच नही जीवनात
प्रेमभंग जाला नही हेगडेचं प्रेम मेलं नही
हेगडेची काॅफीची इस्टेट फुंकून फुंकून
पिईल हेगडेची पांढरीसफेत विधवा
हेगडेची सफेत विधवा झोपेल गड्यावर चढून
हेगडेला आठवत नही कोणच्या रस्त्याने आलता
मांड्यांसारखे फाकलेत दोन रस्ते लांबच लांब
चमकतेत चांदण्यात काळे अजगर मांड्यांचे
हेगडे उभाय माज्या बेचक्यात
हेगडेला कळत नही माज्यातून उठून कुठं जावं
मला कुठं जावं हा प्रश्नच नही
येकदा देवाच्या गळ्यात बांधलं की सगळे प्रश्न
मिटतेत घट्ट
रस्ता उरत नही बेचकी उरते
हेगडे मी तुला सांगणार नही माजी अवकात काय्ये
0

२.

चन्नमल्लिकार्जुना, सांग
हा कुंकवाचा डोंगर हा हाळदीचा डोंगर
हा अबीरबुक्क्याचा डोंगर
ओलांडीला मी तर किती वर्षं लागतील
नाकात नेत्रांत तोंडात घुसतेला रंग लाल
किती असह्य वास जुईच्या फुलांचा डोंगर ओलांडताना

हेगडेचं प्रेत मी कोणच्या डोंगरावरून दरीत फेकू?
की मुंग्या लागायच्या आधी खाऊन घीऊ भात?
काय आसतेत नियम
काय आसतेत कायदे
देवाला वाहिलेल्यांना कायदे लागू आसतेत काय?

पुजाऱ्याचा पुत्र म्हणतेला मी करतत मदत तू जा घरात
वाटेतनं परत येताना कुंपणावरनं मेंदीची पानं आणून कुटलीती
रात्रभर बांधून ठिवलेते हात मेंदी लावून रुमालात सुगंधित
मेंदीत हेगडेचं रक्त
मेंदीत अम्माच्या पुजाऱ्याचं रक्त
मेंदीत आज्जीच्या नवऱ्याचं रक्त

मुंग्यांनी भात खाल्ला तरी त्या पांढऱ्या व्हत नहीत
भाताला रोज हेगडेच्या काॅफीचा वास
आता मला काॅफीच्या बिया कोण आणून देणार
हेगडे एक रांड रडते तुज्यासाठी
0

३.

पुजाऱ्याच्या पुत्रानं हेगडेच्या मेव्हण्याला
निरोप दिलता तो आलता धावून रात्रीलाच
रात्र कसची मध्यरात्र व्हती
चंद्र डोक्यावरती चढलाता पुनवेचा
चंद्रावरतीबी व्हते मेंदीचे डाग

हेगडेचं लाकूड घुसत नव्हतं स्काॅर्पिओमध्ये
मेव्हण्याला घाम फुटतेला मध्यरात्री
पुजाऱ्याच्या पुत्रानं पाणी दिलतं पियाला
मग अॅम्ब्युलेंस आणतेली तिनं आख्खं गाव जागं केलतं
फुटलं हेगडेचं भांडं म्हणून आरबाळलाता मेव्हणा

हेगडेला उचलून नेलतं तव्हा माजं मस्तक व्हतं गुडघ्यांत
शेवटचं तोंड बगावं म्हणून मान वर केली
तर हेगडे दिसलाच नही अंधार निस्ता दिसतेला
हेगडेचा पुत्र दिसतेला कवळ्या चकित नेत्रांचा
त्याचे पाय धरतीनं खिळून घितलेते
चांदण्याउजेडाच्या साखळ्या त्याच्या पायांत पडल्यात्या
त्याच्या ओठांवर सायीचा पापुद्रा व्हता ओला

माजे गाल भयाच्या आश्रूंनी ओले जालते
नेत्रांत गुलालाचं काजळ सुंदर दिसत व्हतं
मी सुंदर रांड दिसत व्हते
मी सुंदर दुःखी व्हते

शक्य जालं आसतं तर बापाला जाळ्याच्या आधीच
त्याच रात्री सदाशिवप्पा आला आसता माज्याकडे
त्याला लाकूड घिऊन जाताना मी निसतीच बगत राह्यले
हारकले मनातनं की या पुढे हेगडे नव्हता आणी तरीबी
मला मिळत राहणार व्हत्या त्याच्या इस्टेटीवरनं
ताज्या काॅफीच्या बिया
0

४.

हुनके देत रडली म्हणतंत कावेरीअम्मा
पदर सारका पडतेला तो सारत व्हत्या बाया
तिची छाती तटतटून आलती
स्तन उसळ्या मारून ब्लाऊजच्या भायेर पलडे आसते
कावेरीअम्माच्या केसांत फुलं माळलीती
कावेरीअम्माच्या कपाळावर मळवट भरलंतं
हेगडेच्या लाकडाला कावेरीअम्माची पर्वा नव्हती

मग पोत तोडलीती खसकन सोन्याचा मणी
हेगडेच्या तोंडात ठिवलाता आणि चार काळे मणीबी
गजरा तोडलाता मळवट पुसलंतं हातानं
बांगड्या फोडल्यात्या दगडावर आपटूआपटून

हेगडेच्या लाकडानं कावेरीअम्माचा हिरवा रंग नेला
हेगडेच्या लाकडानं कावेरीअम्माचा लाल रंग नेला
कावेरीअम्माची फुलं नेली जाईजुईचमेलीगुलाबाची
पण कोण मिटवू शकणार व्हतं कावेरीअम्माच्या स्तनांवरच्या
हिरव्या रेषांच्या हज्जार वाटा
त्या वाटांवरून जाणार व्हती गड्याची बोटं
नाचत नाचत चरत चरत

हेगडेच्या लाकडाची कावेरीअम्माला पर्वा नव्हती
तरी आभाळाकडे हात पसरून ओरडली रडली जनांमध्ये
मग बेशुद्ध पडलीती आखरीला कावेरीअम्मा
शुद्धीवर राह्यली आसती तर तिला
आय्ाकावे लागले आसते बायांचे टोमणे
आज्जी म्हणतेली, हुनके देत रडली कावेरीअम्मा!

दहीभात खात खात आयकत व्हते मी
बाळकैरीचं लोणचं तोंडी लावत लावत
कावेरीअम्मासारखी भूक दाबून ठिवायाची
मला गरज नव्हती
तरी मला आठवत राह्यला कावेरीअम्माच्या
पोटातला खड्डा

आज्जी म्हणतेली, हेगडेला उचलून नेल्यानंतर
घरात आणून तिला न्हाणीत घिवून गेले आंघोळीला
तव्हा आज्जीनं आंघोळीच्या तांब्यातून गुपाचुपीनं
लिम्का दिलं तिला
घटाघटा प्यायली कावेरीअम्मा
0

५.

आज्जी म्हणतेली, तुजं नशीब सटीनं लिव्हलंच नही
सटीसाठी रात्री दार खुलं ठिवलं तरी सटी आलीच नही
सटीला रोखलं आसंल नवऱ्यानं
सटीला रोखलं आसंल सासूनं
सटीला रोखलं आसंल पोरांनी
रोज राती लोकायची नशिबं लिव्हायला जाती
रोज फाटेला सूर्ये उगवताना घरात येती
कोणाला आवडेल आशी पत्नी?
कोणाला आवडेल आशी सून, आशी आई?
सटी सजवत नही शेज सटी गात नही अंगाई

आज्जी सांगण्याचं सूत सोडून देती
आणि दुसराच शब्द धरती
म्हणतेलं तर हासती की काय काय धरून ठिवायचं
आणि कशाला धरून ठिवायचं?
नवरा धरून ठिवला तर काय मिळालं?
सोन्यासारखी पोरगी वाहावी लागलीच की देवाला!

आज्जी हासती मी हातात सूत दिल्यावरती
सांगती की सटीसाठी रात्री दार खुलं ठिवलं
सटी आलीच नही सैतान आला
मी गेलते विहिरीवर अंधारात गुपचूप
चिंध्या धुवून टाकायला रक्त ओहोटत नव्हतं अम्माचं
तुजी अम्मा रक्ताच्या थारोळ्यात
घीण आली आसंल तेवड्यात तू दिसतेली त्याला
तुजा चेहरा चंद्रासारका चमकत व्हता
तुजं अंग चमेलीच्या कळीसारकं होतं
जल्मल्याच्या स्साव्या दिशी फाडली त्यानं तुला
बाई… बाई… तश्शीच गाडावी वाटली
तरी हिम्मत नही जाली
चिंध्यायबी धुवून वाळवून वापरतोत की
तूबी चिंधीयेवडीच व्हतीस
तुजं नावबी नव्हतं ठिवलं
तेव्हापास्नं तुला रगत म्हाईती अहे
सटीनं कदीच लिव्हलं नही तुजं नशीब
नशिबाला दोष नही दिवू शकत तू
मला आणि अम्माला कपाळ अहे हात मारायला
तुला नही
तू जग नशिबाबिगर
0

६.

मला शाळेत जायचं व्हतं
जशी जात व्हती शाळेत हेगडेची मुलगी भारती
निळ्या चौकड्याचा युनिफाॅर्म घालून वेण्या नाचवत दोन
तिचं दप्तर दाट भरलं आसायचं पुस्तकायनी
जसा कैऱ्यानी तिच्या आंगणातला आंबा
जसा कावेरीअम्माचा गळा काळ्यासोनेरी मण्यांनी
जसा अम्माचा देह पिवळ्याधमक भंडाऱ्यानी

मी केवडी भुणभूण केलती तव्हा येकदाची अम्माने आणलीती
माज्यासाटी येक वही आणिक दोन बाॅलपेनं काळी
पण शाळेत नही जायला देलं

शेवटी भुणभुणीला कंटाळून आज्जीनं नेलतं उचलून तर
शाळेतले सगळे सरम्याडम चुपचाप झालते
छत डोक्यावरती
पडल्यासारके
हेडसर आज्जीला म्हणतले की, घरी जा!

किती मुलंमुली म्हणत व्हती प्रार्थना रांगेत
मला रांगच नव्हती
मी कधी म्हणतली नही प्रार्थना
तरी मला पाठ अहे भारत माजा देश अहे आजून

लतामॅडम शाळा सुटल्यावर घरी आलत्या
म्हणतेल्या आज्जीला की, मी शिकवीन वेदिकाला!
तेव्हा मला म्हाईती पलडं माजं नाव वेदिका!
0

७.

आज्जीला माजं नाव यखांद्या फुलाचं ठिवायचं व्हतं
पण अम्मा म्हणतेली, नको काईतरी चांगलं ठिवू दुसरं
फुलं काय कोणीबी तोडतं कोणीबी माळतं कोणीबी वास घेतं
देवाला वाहतंत प्रेतावर घालतंत फुलं
फुलाचं नाव नको नाजूकसाजूक
जाईजुई गुलाब चंपा चमेली शेवंती कोणी नको!

आज्जी म्हणतेली, आपल्यात आशीच नावं आसतेत!
तर अम्मा म्हणतेली म्हणे की, आपल्यात म्हण्जे कोणाच्यात?
आपण कोण?
तुजी अम्मा कोण व्हती ? तुजी आज्जी कोण व्हती?
त्यांची जात काय व्हती? त्यांचं गाव कोणचं व्हतं?

मी आज्जीला इच्चारलं, अम्मा तर बोलत नही ना तुज्याशी
मग हे कसं बोललीती?
आज्जी म्हणतेली, मला कुठं बोलली?
देवासमोर बसलोतो, ती देवाला बोलली!

मग आज्जीनं सांगलिती कहाणी की,
पुजाऱ्याच्या मेलेल्या मुलीचं नाव व्हतं वेदिका, तेच ठिवलं तुला
समजलं तव्हा ढसाढसा रडलीती पुजाऱ्याची बायको
म्हणलीती दुधाच्या घंगाळात घालून मारलंतं माज्या लेकीला
जल्मली आणि सतराव्या दिशी तिचा आज्जा मेला
त्यानं आपशकुनाची वाटलीती ती तिच्या आज्जीला
लेकीचं बारसं करून, तिचं वेदिका नाव ठिवून पाचच दिवस जालते
गाडली मातीखाली मुकाट्यानं, रडायचीबी चोरी पोरीसाठी!

पुजाऱ्याची बायको बनवते गुपाचूपीनं शेंगाउंडे माज्यासाठी
मला आवडतेत म्हणून आणि खाऊ घालते समोर बसवून
आश्रू पुसत पुसत
0

८.

लतामॅडम तोंडाला लॅक्मेचं क्रीम लावतंत
लतामॅडम केसांचा अंबाडा नही बांधत वेणी घालतंत येक सरळ
लतामॅडम वेणीला गंगावन लावतंत
लतामॅडमच्या ब्लाऊजाची बटनं मागे आसतंत अम्माची पुढं
लतामॅडम इरकल नेसत नही फुलांची साडी नेसतंत
लतामॅडमचा हात मऊ चेहरा खडबडीत

लतामॅडमच्या बारीक नेत्रांत पाणी येतं तेव्हा
मंदिरातल्या सारिका हत्तिणीसारखे दिसतंत त्यांचे नेत्र
सारिका हत्तिणीच्या कपाळाला जकम जालीय्ये अंकुश टोचून टोचून
तरी माहूत म्हणतेला की मी हत्तिणीवर प्रेम करतो!

माहूत खायला देतो सारीकाला, नदीवर नेऊन आंघोळ घालतो
सारिका पाणी उडवते सोंडेने
लतामॅडम आणि मी कधीकधी नदीवर फिरायला जातोत
मला पाठ जालाय्ये सतराचा पाढा
माजं नाव मी लिव्हते इंग्लिशमध्ये बरोब्बर.

लतामॅडम म्हणतेल्या आज्जीला की, कोणत्या भाषेत
शिकवायचं वेदिकाला?
आज्जी हासती निस्ती… म्हणती, कोणत्या भाषेला
गिराईक अहे जास्ती? चांगल्या शिरीमंत गिराईकाच्या
भाषेत शिकीव माज्या नातीला!

लतामॅडम मला इंग्लिश शिकवतंत
वाटेनं जाताना कन्नड पाट्या
थोडं हिंदी थोडं मराठी
लाहान आसताना खूप भाषा येतल्यात म्हणतेल्या लतामॅडम
मोठेपणीच्या भाषा दोनच
एक देहाची दुसरी पैशांची
0

९.

अम्मा थुंकली तरी तिच्याकडं मान वळवू वळवू पाहतंत पुर्षे
अम्मानं शिवी देली तरी हासतेत हुप्पे दिसतेत
येकदा येक हुप्प्या झाडावर लाल ताठ लिंग हालवताना दिसलाता
मी घाबरून पळत सुटलीती परकरातल्या कैऱ्या फेकून घराकडं
या पुर्षायचं कपड्याआत तसंच आसणार
अम्मा बगत नही त्येंच्यातल्या येकाकडेबी
अम्माला वाटते की या गावातल्या पुर्षायची अवकात नाहीय्ये
की तिनं बगावं येकडाव त्यांच्याकडं!

अम्मा चालती ताठ छाती पुढे काढून सारिका हत्तीणीसारकी
अम्मा निवांत चालती तिला घाई नसती कसली
लतामॅडम म्हणतंत की त्यांच्या पायांला चाकं हईत
त्यांला धावावं लागते सारकं तरीबी संपत नही काम
किती करावं किती करावं किती करावं!

लतामॅडमकडे बगत नही येकयबी पुरुष
अम्माकडे पूर आसतो पुर्षांचा लतामॅडमकडे दुष्काळ
अम्मा बोलत नही काई लतामॅडमपण बोलत नही
आज्जी म्हणतेली की नक्को प्रश्न इच्चारू त्येंला
मला इच्चार काय ते आणि आज्जी हासती
आज्जीची मधाच्या पोळ्यासारकी लोंबती थानं हालतात हासताना
0

१०.

वेणी घालून देता देता आज्जी म्हणतेली, गावात बेसवा उधळलाय
हिंडू नगंस, घरात बईस, शिंग खुपसायचा पोटात
तर पुजारी हासत म्हणतेला की, हीबी बेसवीच की गावाला वाह्यलेली
हिला कसला बेसवाचा धाक घालते?
आज्जी हासती खूप हासती… आरे माणसांसाठी बेसवी ती, जनावरांसाठी नही
देवाला म्हणता गावाला वाहता!

मी इच्चारलं आज्जीला की बेसवीला का नही असत शिंग बेसव्यासारकं?
आज्जी म्हणतेली, त्ये इच्चार तुज्या लतामॅडमला
माणसाला शेपूट व्हतं तशी व्हती का शिंगं कोणच्या काळात?!
आज्जी हासती निस्ती, आज्जीच्या नेत्रातून हासूच वाहातं

आज्जीला आठवतंत तिच्या मस्तकावरल्या जटा
आज्जीला आठवतेलं की, ओकळीच्या येळी
भर रस्त्यानं कसं लिंब बांधून नागडं नाचवत नेयाचे तिला
हातात लिंबाच्या डाहाळ्या निस्त्या बचावासाटी
रस्त्याच्या दोनी कडांनी आंगावर रंग न् पाणी फेकतेली पुर्षं
छातीला चिपकलेली ओली साडी भुकेनं बगणारे हज्जार नेत्र
किती नाचलं तरी सरायचा नही मंदिराचा रस्ता
किती युगं नाचायले, नाचत धावायले वाटे… लाखो वर्षं!

आणि मदकेरीपुऱ्यात सिद्दी अत्तूच्या येळंला पाठीला आकडा लावून
खांबाला टांगायचे मैदानात साडी सुपारी नारळाच्या बदल्यात
लटकत दाखवत ऱ्हायची आंगं मुकाट्यानं
आणि नमस्कार करायचा थोरामोठ्या लोकांला की त्यायनी
करून घिटलं मनोरंजन आमच्याकडनं
देवाच्या खेळासाटी केली आमची निवड, देला मान!

सांगताना आज्जी हासती जसं ते तिचं आयुष्यच नव्हतं
जशी ती सांगत व्हती दुसऱ्या कोण्या बाईची कहाणी

आज्जी हासती माजी लांब तिपेडी वेणी घालत
केसांना नारळाचं दूध लावत जा म्हणती न विसरता
फूल टोचती वेणीवर लाल गुलाबाचं अलाबला घेती
0

११.

लतामॅडम घराला मनिआॅर्डर करतंत
आज्जीपण करतेली कोणालातरी
मी पाह्यलं दोगींना पोस्टात
आज्जीला इच्चारलं तर हासती
मी ठिवते सूत धरून
सांग की गं सांग की गं सांग की गं

आज्जीची सवत अहे सावित्री, सावित्रीचा पुत्र अहे महेश
आज्जी म्हणतेली, त्येचं मस्तक पांगळं अहे
त्येचं मस्तक चालत नही त्येचं मन धावत नही
निस्ता पिंडदेह वाडतो जसा पोटाभायेर मांसाचा गोळा
हासत आसतं लेकरू त्याचा काय दोष त्याच्या पित्याचं कर्म ते
त्येची लाळ गळते म्हणून दुःख जालंतं सावित्रीला तेव्हा समजावलं मी
कोणत्या पुरुषाची लाळ गळत नही सांग सगळे गळके
नेत्रांनी लाळ गाळतात कातडीनी गाळतात
लिंगबोळ्यानी गाळतात लाळ निस्ती
कोणाची दिसते कोणाची नही

आज्जीचा नवरा मेला त्येला महेशनी अग्नी देलता
आज्जीची सवत मरंल तिला महेश अग्नी देईल
आज्जीच्या मनिआॅर्डरवर जगते सावित्री जगायलाय महेश
आज्जीला वाटते आशा की तो आज्जीलाबी अग्नी देईल

आज्जीला मी म्हणतेले, आज्जी, मी जाळलं तर
तुजं लाकूड जळणार नही काय?
आज्जी म्हणतेली, लाकूड जळंल, पण माजा आत्मा
नरकात तळमळंल.
हित्तं नरक थित्तं नरक मला कुठं स्वर्ग नको का?
0

१२.

छातीला नेत्रांनी चिमकुरा काडत तहसीलदार म्हणतेला
आता कुटं राह्यलीये जुनी प्रथा आता कायद्यानं आलीये  बंदी
आता कोणी वाहते का पोरी देवाला? तुमचे स्वार्थ कधी संपतेल?

तहसीलदार यिवून बसलाता आंगणात चहा पीत
आज्जीची आणि अम्माची सरकारी पेन्शनचा फाॅर्म भरत चिडून
जणू काय त्याच्याच खिशातनं द्येणार होत्ता तो
मह्यना पाचशे रुपडे!

अम्मानं फेकला त्येचा कागद बोळा करून
आज्जीनं मात्र आंगठा लावला लक्ष्मीचा अनमान नको म्हणून
हेगडे आलेता तितक्यात आणि संतापला की सुरळी कर
तुज्या फाॅर्मची आणि घालून घे गांडीत
पाचशेत तिची पायांतली चप्पल तरी येईल काय?

तहसीलदार लाल नेत्रांनी जळत म्हणतेला, सेहेचाळीस हज्जार बायका
या कर्नाटकात घिऊन राह्यल्यात देवदासीचं पेन्शन
आणि आता या बायकांची काय सोन्याची पुच्ची अहे का काय?

मला हासण्याच्या इतक्या उकळ्या व्हत्या फुटत
दूध उतू जात व्हतं दातांतून शुभ्र
हेगडे पिसाळलाता मस्तकावर मधमाश्या घों घों करत असल्यासारकं
त्याच्या गळ्याचं हाडूक येड्या कुत्र्यावाणी जागच्या जागी फिरत व्हतं कातडीत

अम्माला शिंग आसती बेसव्यासारकी तर तिनी खुपसलं असतं शिंग आधी
तहसीलदाराच्या पोटात आणि मग हेगडेच्या
0

१३.

कोऱ्या साडीचा गंध लिंबाचा गंध भंडाऱ्याचा गंध फुलांचा गंध
कडू हिरवा गोड सफेद तुरट पिवळा घमघम घमघम
कळंना नाकाला काई येगयेगळं

आज्जीनं आंघोळ घाटलीती उष्ण उदकानं जसा
सूर्येच ओतायलीती आंगावर
निस्त्या वाफांनी धुकं भरतेलं दगडी न्हाणीत
जसा भिंतींना पाजर फुटंल आत्ता, पण नही फुटला

लिंब बांधलाता वल्या आंगाला देवासमूर
केसांचा आंबाडा नारळायेवढा, आबोली, जाईजुईचे गजरे
मस्तकावर लिंब तोंडात लिंब कपाळावर भंडारा आणि कोरी साडी
सोन्याची जरकाडी चमचम चमचम मातेचा घोष उदे उदे
जीभ कडू नेत्र तिखट पिवळ्या धुक्यात मातेचा घोष उदे उदे
बाशिंग न् मुंडोळ्या चकचक झकझक चौंडकं वाजतेलं उदे उदे
सुपात तांदुळ तांदळात खंजीर खंजीराला पटका पटक्यावर बाशिंग
न् मुंडोळ्या चकचक जकजक चौंडकं वाजतेलं उदे उदे

मोरपिसांचे नेत्र गरगर फिरतेले रंग हिरवा जांभळा पारवा
चळचळ  टाक टाकावर कुंकू
बगतेली देवी चांदीच्या नेत्रांनी टकमक टकमक
फिटतेला आंतरपाट मस्तकावर पिवळ्या आक्षदांचा सपसप मारा
पिवळ्या आंधाराचे लपके पडतंत खालती
त्याचे शिंतोडे उडतंत नेत्रांत उडतंत उजेडात दिसत नही देवी
दिसत नही सुपातला खंजीर दिसत नही भिन्नटलं बाशिंग उदे उदे
अकरा वर्षांची वेदिकानवरी लाख वर्षांचा खंजीरनवरदेव उदे उदे
पिवळ्या आंधाराचे लपके पडतंत खालती लपालप लपालप
0

१४.

आज्जीनं मला सांगल्या नव्हत्या सगळ्या गोष्टी
जसं की, सटीच्या जागी आलता तो सैतान कोण व्हता?
अम्मालाही नही म्हाईती तिची शुद्ध हरपलीती त्यायेळी रगतानं
अंधारात आज्जीला दिसलं नसेल तोंड अम्मा म्हणतेली येकदा
पण आज्जीचंच तोंड दिसायचं नही हे इच्चारलं की तीन तास

आज्जी मासूम तोंडानं दहीभात खायची तळली मिरची घालून
दह्यानं गार वाटतेलं काकडीनंपण
मला कशानंच गार नही वाटत बर्फ खाल्ला कुडुमकुडुम तरी
घसा धरतो पण गार नही वाटत

आज्जीनं नवस बोलला व्हता आन्नपूर्णेला, तो फेडायला गेलतो दोगी
हेगडेनी गाडी देलेती स्काॅर्पिओ
आन्नपूर्णा हासत व्हती लकलक आज्जीसारकी सुंदर तोंडानं
आज्जी म्हणतेली, वेदिका फुलांत आली माते, तुजी पूजा बांधते
इला अन्न कमी नही पडू कधी, पाणी कमी नही पडू कधी!

प्रदक्षिणा घाटल्या तर थांबू नही वाटतेलं
फिरतच ऱ्हावं गोल गोल गोल देवीभवताली
आज्जी धावतेली माज्यामागं आगं आंगात आलं काय तुज्या?
सभामंडपात बसलो दोगी रातभर
आभाळात निस्ता चांदण्यांचा पूर
निगताना पुन्हा भेटलो आन्नपूर्णेला ती तशीच हासतेली

नीर डोसा खाल्ला रागी मुद्दे खाल्ला
काॅफी पिऊन निगालो
नागडा भिकारी ओरडू लागतेला आज्जीला बगून
लोकं बगतेली थांबून थांबून
आज्जीनं बगीतलं थांबून, बगत राह्यली खीनभर नीट
मग चमकून मला ढकललं मागं, जा गाडीत बस म्हणतेली
निगाली तरातरा हात झटकत संतापानं वळून
तर ओरडलाता भिकारी आकाशभरून
त्याच्या अंगात रक्त नही पू वाहात आसणार
तो माणूस नव्हताच, व्हता जणू येक पिकलेला फोड

मला स्काॅर्पिओत बसवून आज्जी मागं गेलीती परतून
आशीच गेले तर स्मरणातून नही जाणार, पुटपुटली
खांद्यावरची शाल भिकाऱ्याच्या अंगावर टाकली शांत चित्तानं
फोड फुटला हंबरून हंबरून
लोकं गप्प पांगली

आज्जीला निसती नखावरून ओळखू येतात कोणचीबी पुर्षं
आज्जीनं सैतानाला ओळखलं नसेल यावर कधीच
विश्वास नव्हता माजा; आज खातरी जाली, तोच हा!
0

१५.

आन्नपूर्णेचं दर्शन जालं आज्जीचा नवस फेडला
आता फेडायची व्हती रेशमी वसनं हेगडेने देलेली हेगडेसमोर
आधीच जाली व्हती बोली ते मलाबी म्हाईती व्हतं
हेगडेने अम्माच्या नावावर केलता तीन येकराचा मळा

हेगडेची इस्टेट इत्की मोठी अहे, इत्की मोठी अहे…
आज्जी म्हणतेली
…आठोडा पुरणार नही फिरून बगायला!
बाकी काई बगायचं नसते पुर्षात
पलंगाजवळ त्याचे पाय वाजतले की मिटायचे नेत्र
बाईला लज्जा वाटतेली आसं वाटतेलं त्याला
करू देयाचं काय करतंलं ते, कश्यालाबी नही म्हणायचं नही
दुखलं तर दुखू दे… नंतर सुख कळते आपोआप…

अम्माचा दगड जागेवरनं हालतच नव्हता
अम्माच्या जिभेला आबोल्याचा सर्प डसला व्हता

आज्जीनं नेसवून देली सहावार कांजीवरम हिरवीजर्द
आज्जीनं चढवून देले दागिने कानांनाकात केसांगळ्यात दंडामनगटांत
कमरेवर पट्टा आणि आखरीला पायांच्या बोटात मासोळ्या

हेगडे मला दिसतेला नही नीट समईच्या उजेडात
हेगडेला मी दिसायची गरज नव्हती
हेगडेनं पाजली मला दारू, पिऊन टाकलं मला गटकन्
0

१६.

आज्जीनं कोणाकोणाला क्षमा केलेलीती

पह्यला कार्तिक नारायण, तिचा नवरा
पुत्र पाह्यजे म्हणून त्यानं सवत आणतेली
ती पोटुशी राह्यना म्हणून नवस बोलला, पुत्र जाला की
आज्जीची लेक देवीला वाहीन!

दुसरी सावित्री, आज्जीची सवत तिनं पुत्र जाला की
घाई केली नवस फेडायला नवऱ्याकडे
आणि आज्जीही आली घर सोडून लेकीसंगट देवळात

तिसरा पुजारी, त्यानं देवाची बायको अम्माला
आपली बायको मानलं, गावाची बायको मानलं
देवनवरीला गावनवरी केलं

चवथा सैतान मला फाडणारा
त्या भिकेला लागलेल्याच्या नागड्या देहावर शाल घाटली

पाचवी अम्मा जी तिच्याशी जीवनभर नही बोलली
सुखाचा शब्द नही दुःखाचा शब्द नही

आज्जी क्षमा करेल का मला साहाव्वीला
मी हेगडेचा खून केला हे समजल्यावरती?
की मी त्याला खेळवून खेळवून मारलाता हे आज्जीला
कळलं आसेल का आधीच?
0

१७.

सदाशिवप्पा कवळा व्हता सुंदर कच्चा
हेगडेचे दिवस झाल्यावर आला पुत्रकर्तव्य करून
मुंडण केलेलं त्याचं मस्तक सुंदर दिसत व्हतं
अस्थिकलशासारकं तांबूस चमकत व्हतं
मी हसतेले खळखळून कितीवेळ भद्रा नदीसारकी
म्हणतले त्याला, वाहून टाक मस्तकातल्या अस्थी माज्या हासण्यात!
संपलं दुःख सदाशिवप्पाचं, संपलं दुःख माजं
रात्रही संपली संपू नये वाटतेली

सदाशिवप्पा आला येत राह्यला रोज रात्री
रोज रात्री चांदण्याला पूर
चुंबनाला ताज्या काॅफीच्या दळलेल्या बियांचा वास
रोज रात्री सदाशिवप्पा रोज रात्री

हेगडेला विचारणारी कावेरीअम्मा होती
सदाशिवप्पाला कावेरीअम्मा कोण विचारणारी
तिला तर गड्यापासून सवड नही, इस्टेटीपासून सवड नही
हेगडेचा मेव्हणा हबकलाता
मेव्हण्याची बायको म्हणतेली की,
घरात सवाष्ण पाह्यजे, हेगडेच्या घराण्याचा देवधर्म कोण करणार?
कुलाचार बुडले की कूल बुडायला येळ नही लागत!

लग्नानंतर यिणार नही कदी म्हणतेला सदाशिवप्पा
इस्टेटीवरून पाठवीत राहीन म्हणतेला काॅफीच्या बिया तेवढ्या
नियमानं
0

१८.

सदाशिवप्पा घिऊन गेलेता मला मातंग पर्वतावरती
मला घेयाचं होतं दर्शन विरूपाक्षाचं
की रावणानं ठकून की थकून तिथं धरतीवरती ठेवलीती पिंडी
लिंग खिळलं जमिनीत नेता नही आलं हारला रावण

मंदिराच्या भवताली शीळांवर शिळा
मला नवल नही वाटलं की लहान शिळा मोठ्या शीळेला
कशी जन्मभर डोक्यावर घिऊन बसते
कोणत्याच बाईला वाटत नही नवल पुर्षांसारकं
नवल करीत राह्यला सदाशिवप्पा

कसा आर्धा सिंह आर्धा नर अहे हा विरुपाक्ष देव
त्येच्या सोनेरी आयाळीत मस्तक खुपसावं वाटलंतं तेव्हा
सिंहावर स्वार व्हावं आसंही वाटलंतं

पूजा केली सदाशिवप्पानं, पुजाऱ्यानं त्याला
गोत्र विचारलं गणगोत विचारलं
मी गप्प मला काही नही विचारलं
पुजाऱ्यानं मानली मला सदाशिवप्पाची पत्नी, मंत्र म्हणले
हाॅटेलवाल्यानंही मानली मला सदाशिवप्पाची पत्नी
चांगली मोठ्ठी खोली दिली राह्यला तीन दिवस दोन रात्री
खिडकीतूनपण दिसत होत्या शिळा

आम्ही गेलो मातंग पर्वतावर खालती खळखळ भद्रा
मला उतरायचं होतं खालती धुक्यातून
पण सदाशिवप्पाच्या मनात धुकं आणि भीती
सूर्यानं चाटून घितलं धुकं जसं मी सदाशिवप्पाला
मग धावत सुटलो भद्रेकडे मागे नही पाहिलं

थांबले एकदम. थांबला सदाशिवप्पा. दचकलो दोघं.
काळ्या शीळांवर रेघाच रेघा होत्या पांढऱ्यासफेद
ओरबाडलेल्या लांबच लांब रेघा
येकटा गुराखी म्हणतेला, रावणानं उचलून नेलती सीतेला
तिचा वल्कलाचा पदर फरफटला हित्तं
त्या फरफटीच्या रेषा या
0

१९.

घशातल्या लहानग्या हाडमण्य्ाावर एक मोठा आवंढा शीळेवर शिळा
फुटत नही पडत नही ढळत नही
विरुपाक्ष बसलाय्ये खांबातून भायेर यिवून मंदिरात आर्धा नर आर्धा सिंह
तो यित नही मंदिरातनं भायेर आणि आज्जी म्हणतेली का आपण
जायचं नसते मंदिरात
मी नही विचारत का जायचं नसते?
काय करू त्याला बगून? काय करू त्येच्या जवळ जावून?
आयकायला आलं आस्तं तर आगीतून प्रल्हादाला काढलं
दरीतून झेलला आल्लाद तसं येका तरी बाईला त्येनं दिला आसता हात
देवाची बायको म्हणतेत तर तेवा देवातला सिंह आसतो का निजलेला
आणि आर्धा दुबळा नर जागा?
का देवालाई वाटत नही गरज स्वतःच्या पत्नीला खातेऱ्यातनं काढायची?
मला वाटते की आवंढा लाल होवून फुटंल मोठ्ठा आभाळभर
लाल होईल आभाळ रात्र लाल दिवस लाल माती लाल पाणी लाल
आर्ध मंदिर पाण्यात ते पुरतं पाण्यात जाईल देव बुडंल
हाका मारून सोडंल निस्त्या… वेदिका वेदिका वेदिका तार मला!

मी शपथ देईल, वचन मागील, माजी कूस फळू दे
मी जल्माला घालीन मग येक चांगला देव.
0

२०.

सदाशिवप्पा रात्रभर गुमसुम व्हता बिछान्यात
म्हणतेला तुला हिऱ्यांच्या कुड्या देतो
त्या तर आधीच दिल्या होत्या हेगडेनी
नेकलेस देशील तर खरा म्हणतले
आत्ता सोन्याचा देतो निस्ता मग हिऱ्यांचा देईन
म्हणतेला सदाशिवप्पा कोरड्या ओठांनी
त्याच्या ओठांवरची साय मी संपवून टाकली व्हती

पहाटेच्या प्रहराला बिछान्यातून उठून निघून जातेला सदाशिवप्पा
त्याची पाठ मला फार आवडते घट्टमुट्ट दणकट
सदाशिवप्पाची पाठही रडते मला सोडून जाताना
त्याचे दगडाचे पाय आवजड उचलू उचलू नेतो कसेबसे
इतक्या हट्ट्याकट्ट्या पुर्षाला इतकं जमतेलं
सदाशिवप्पा सोडून जातो बिछान्यात नेत्र
इथंच ठिवतो ओठ माज्या ओठांवर
ठिवून जातो लिंग माज्याशिवाय दुसरी कुणी नको त्याला

कावेरीअम्मानं शपथ घाटली लग्नाआधी
तरी म्हणतेला, वंशाचा दिवा देईल, मग स्पर्श नही करणार
जयंतीला! वेदिका नको, तर जयंतीबी नक्को.
मला सांगताना फुटला त्याचा दगडाचा बांध
कातडीआत पुराचं पाणी चक्राकार घुमत फिरतेलं
माज्या मस्तकातही तेच तसंच चक्राकार
सोताला नीट गुंडाळून बांधून घिऊन जा म्हणतले मी
म्हणतले काॅफीच्या ताज्या बिया पाठवत जा विसरू नको

सदाशिवप्पा म्हणतेला आखरीच्या रात्री मला
तू माजी आई होती माजी बाई जाली आता तू माजी लेक व्हय
आईक माजं आणि शिक्षण कर
त्या रात्रीपर्यंत  मी कधीच कुणाला म्हणतेलं नव्हतं आप्पा
त्या रात्री म्हणतेलं आणि गाढ नीज लागली नेत्रांना

सदाशिवप्पानं पाठवला पुस्तकांचा गठ्ठा बियांच्या पुडक्यासंगट
धाव्वीची परीक्षा भायेरून दे म्हणतेला अभ्यास कर रोज
पास जाली तर म्हैसूरला काॅलेजात धाडीन म्हणतेला
माज्या नेत्रातला गुलाल मी उधळीला त्याच्या लग्नाच्या
वरातीत नाचताना
0

२१.

नाचायचं व्हतं रितीप्रमाणे आता सदाशिवप्पाच्या वरातीसमोर
हेगडेच्या मेव्हण्याच्या बायकोनं आणून देलेली इरकल
परत धाडली अम्मानं आणि आणविली पिवळीलख्ख कांचीपुरम
पदरावर हिरवे पोपट आसलेली
जळफळलीती हेगडेच्या मेव्हण्याची बायको, तरी गप बसलीती
कारण की तिचीच भाची देलीती सदाशिवप्पाला
आजून आठरा जाले न्हवते पुरते जयंतीला
तरी खोटा दाखला आणलाता शाळेतनं

आता भुकेल्यापोटी वरातीसमोर नाचणं आवघडच होतं
कावेरीअम्मा बगत व्हती दारामागनं सफेत रेशीम नेसून
तिचे नेत्र चिकटले व्हते माज्या कांचीपुरमच्या
पदरावरच्या पोपटांवर
पोपटांच्या चोची रक्तासारक्या लाल व्हत्या
0

२२.

आज्जीला इच्चारलं, इत्का भंडारा कशाला
आपल्याच नशिबाला?
आज्जी म्हणतेली, आपल्याइत्क्या जखमा
दुसऱ्या कोणाकडे हईत?
जखमांची हाक आसती हाळदीला!

आपल्या जखमांना आसतंत हजार नेत्र
हजार नेत्रांना नसत्यात पापण्या
दुनियेची दुःखं दिसत राहतंत सारकी
म्हणून पाह्यजे भंडारा
दुःखनाशाला.
0

२३.

लग्नाच्या येळंला कुंकवानं माखतेलं मस्तक बगून
आज्जी म्हणलीती समाधानानं की, ह्ये आस्संचऱ्हाणार आता मरेपस्तोर
देवाची नवरी विधवा नही होत कदीच देव जित्ताच आसतो नेहमी
मला पुन्हा घुसळाव वाटतेला समुद्र आणि काडावी जबरी इखाची वडी
अमृताला जुमानायची नही आसली कडू
देवाला मारावं विष देवून विधवा बनावं लाख सवतींसंगट
छाती पिटून रडू सगळ्यामिळून देवाच्या नावानं कुंकू पुसू
सुंदर दिसतेलं पांढरं सफेद कपाळ आसल्या मळवटापेक्षा
मेलेल्या देवाशी पुन्हा कोणचीच माणसं लावायची नहीत लग्नं
कोणच्याच मुलीचं
0

२४.

जयंतीसाठी सवाष्ण बायकांनी म्हणतेलं लक्ष्मीशोभान
कडेपाटाच्या माडीवर गात व्हत्या सगळ्या
जयंतीला मामानं साडी आणलेती हळदपिवळी
जयंतीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं सदाशिवप्पानं
तुंगभद्राची ओटी भरली फळांनी तुंगभद्राची आरती केली
जयंतीचं नाव बदलून ठिवलं तुंगभद्रा सदाशिवप्पाच्या आज्जीचं
ती आलेती तेव्हा घराण्याचं नशीब फळलेलं म्हणतेत
तसंच आता फळावं फिरून, वेदिकाची सावली सारून

सदाशिवप्पा, तुला टू इन वन वाइफ मिळाली बग
मी म्हणतेली खदखदून हासून
की ही तुंगा पण आहे, भद्रा पण आहे!
जलातून पृथ्वीला भायेर काढतेलं वराहानं
आणि थकून थांबलाता बिचारा पर्वतावरती तव्हा
त्याच्या दोन्ही सुळ्यांतून टपकू लागतेलं पाणी
येक धार तुंगा येक धार भद्रा
सदाशिवप्पा तुला येकीतच दोगी मिळाल्या!!

तुंगभद्राच्या नेत्रातून पाण्याच्या धुसफुस धारा
तुंगभद्राच्या मनात भयाचा लालकाळा चिखल
तुंगभद्राला कोवळा राग शाळा सोडावी लागतेली त्याचा
तुंगभद्राला अपमान की सदाशिवप्पा रोज रात्री जात व्हता
गावनवरीच्या घरी जिथं जात व्हता तुंगभद्राचा सासरा तिथंच
पण कोण इच्चारतंय जयंतीच्या हट्टाला? आणि आता तर
तिची तुंगभद्रा केलीये.
0

२५.

अम्मानं जावू नही देलं काॅलेज शिकायला
सोडू देलं नही घर, सोडू देलं नही गाव
मरणयेळ आली म्हणताना शपथ घिटली माज्याकडनं
आज्जी ओठ आवळून उभी आयकत दाराभायेर

अम्मा समजावतेली म्हैसूर पणजी सोलापूर कोल्हापूर कुठंय जा
भूतकाळाचं लुब्र कुत्रं तुजी पाठ सोडणार नही
पायांत पायांत येईल मुडदा लूत भरलेला असह्य वास
जाईजुईचा डोंगर ओलांडायला गेली तरी जखमी कुत्रं
येईल तुज्या मागं मागं मागं
मग पुढे जाणं आवघड मागं येणं आवघड
आहे तशी राहा आहे हित्तं राहा

मी म्हणतेलं का मी पाळीन लुब्रा कुत्रा लूत भरलेला
धुईन त्याचं अंग साबणानं औषध लावील जखमांना
बरा करील त्याला मग राह्यला काय गेला काय त्याची मर्जी
आज्जीनं कसं बरं केलं आसेल मला साहाव्व्या दिवसापासनं
कसा जित्ता केला आसेल माजा कवळा मुडदा
कितीदा पुसलं आसेल मांड्यांमधलं रक्त
कितीदा लावली आसेल हाळद उगाळून
आज्जीचे हात चंदनाचे
आख्खी आज्जीच उगाळलेल्या चंदनाची गोळी

अम्मा हासली येड लागल्यागत खदखदून
म्हणतेली, तुला जगवण्यात स्वार्थ व्हता
तुला काय झ्याट मिळणार भूतकाळ पाळून?
0

२६.

अम्मा रडतेली कळवळून आंथरुणात पोटाशी पाय घिऊन
तिचं आंग येतं भायेर ते हातानीच सारते आत
हात रक्तानं भरतात साडी रक्तानं भरते धुते उठून तिची ती
आज्जीला हात नही लावू देत आता मी धुते रोज इतकं रक्त
किती वेळ नेत्रांना लाल दिसत राहते प्रीथ्वी
फक्त रक्ताचा गंध येतो पाण्याला अन्नाला

जात का नही डाॅक्टरकडे? – लतामॅडम म्हणतेल्या आज्जीला
अम्मा बोलत नही आज्जीशी, त्यांनी समजावून गप्प ऱ्हायते
पुजाऱ्यानं बंद केलं तव्हापास्नं अम्माकडे येणं
मात्र आता रोजच्या रोज येतली पुजाऱ्याची बायको
अम्माजवळ बसून राह्यते
अम्माचं काही खरं नही म्हणतेली आज्जी हेगडेला
म्हणतेली की कसं व्हइल आता या पोरीचं? कसं व्हईल माजं?
तेव्हा हेगडेनं पह्यलांदा पाह्यलं मला वरखाली अधेमधे मागंपुढं
कवळी होती माजी छाती, कवळे होत्ते ओठं!

आयकून अम्मा रडतेली हंबरून हंबरून आंथरुणात
आज्जी मला म्हणतेली, थांब हित्तं जरा
माजं पाय पळू पळू जात राह्यले अम्माजवळ

अम्मात रंग नही राह्यला, सफेत जाली कातडी
आता काळी होईल का मरताना? म्हाईती नही
मी विचार करतेली रात्रभर दिवसभर की
कसं दिसणार अम्माचं लाकूड?
देवळामागल्या देवचाफ्याच्या खोडाला किड्यांनी खाल्लेतं आतून आतून
आखरीपस्तोर समजलं नही पुजाऱ्याला
कारण पानं गळाली की फुलं येयाचीच त्येला
पोखरलं तरी कुठून येतला बहर नही कळे

तुजी अम्मा देवचाफा व्हती गं… म्हणत हळूहळू रडतेली
पुजाऱ्याची बायको जसं शंखातून गळतं पाणी
देव धुवून जाले की शंख धुतो पुजारी तसं लाल दिसतंत आश्रू कुंकवानं
रक्त रडती जणू ती
पुजारी नही रडत आज्जी नही रडत मी नही रडत
रडतंत लतामॅडम येकटी स्फुंदत जशी त्यांचीच अम्मा मेली
0

२७.

देवाला लागतेलं सुतक त्येची नवरी मेली
नभात मळवटाचा लाल पट्टा उठलेता
हाळदउधळ्या सूर्य उतारलाता कळसावर झाडंपानं सुवर्णाची
त्यावेळी देवाला लागतेलं सुतक त्येची नवरी मेली
तिला नेसवलीती कोरी साडी आणि पांघरलंतं रेशमाचं देववस्त्र
देवाच्या देहावरून उतरवून आणि देवाच्या देहावरून उतरवेली
वाह्यलेली शुभ्र आणि लाल फुलं ती सगळी घातलीती तिच्या लाकडावर
देवाशिवायचं येक फूल नही मिळतेलं तिला
तसंबी लाकडाला फुलांचं काय वस्त्रांचं काय

मरणाचा सोहळा देवळाभायेर देवळामागे
मागे राह्यलेल्या कोणाच्याच मनात नही फुटल्या काळ्या लाह्या
देवाच्या मनात आजून हज्जार नवऱ्या
मला मरणाचं भय नही मरणाचा राग नही घीण नही
मला घीण येतली सोहळ्याची, देववसनाची, उतरवलेल्या फुलांची
मला घीण येतली पुर्षांच्या वासल्या नेत्रांची
ते बगतात आजून येकटक प्रेताचाबी चेहरा वासल्या नेत्रांनी
लाकूड जाली बाई तरी संपत नही त्येंची देहाची हाव

पुर्षांच्या वासनांच्या भोवऱ्यात अम्माचं लाकूड आडकून
फिरतेलं गरागरा गरागरा गरागरा
तसलंच दिसतेलं माज्या नेत्रांना
तिरडीला बांधून जाळलंतं तरीबी

राख सावडायला गेलते तर उठलं व्हतं वावदान
राख जातेली उडून गोल गोल फिरत नभापस्तोर
जातेली गावभर येकेकाच्या वासल्या नेत्रांत
हाळद राख कुंकू राख वस्त्रं राख फुलं राख
राख जातेली देवळाच्या कळसावर

देव पाळतेला सुतक नवरीचं
गाव मोकळा बेसव
0

२८.

आज्जीला आज्जी म्हणता येतं अम्माला अम्मा
प्रीथ्वीला प्रीथ्वी सागराला सागर नभाला नभ
पण आता जयंतीला तुंगभद्रा म्हणावं लागतंय

जयंतीला सगळंच बदलावं लागतंय, म्हणतेली आज्जी, तुला नही
ती लग्नाची तू लग्नाची नही

मला गप्प बसावं वाटतेलं अम्मासारकं
मला हासावं वाटतेलं आज्जीसारकं
मला वाटतेलं लचके तोडावेत नभाचे
मला कळत नही वेदिकानं काय करायचं असते?

पौर्णिमा जाते अमावस्या येते
अमावस्या जाते पौर्णिमा येते
माजी चुकत नही पाळी बदलत नही मी
मी सुंदर दिसते दूधसागरासारकी
मी पवित्र वाटते मला
0

२९.

आज्जी सांगत आली सक्काळीच की,
बाई बाई तुंगभद्रा मिळाली कृष्णाला!
मी हासून म्हणतले, इतका तर भूगोल मला लतामॅडमनी
शिकविला आणि दिसले आवचित
आज्जीच्या नेत्रांतले सफेद मेघ कोरे करकरीत
भयानं पिंजलेले पुंजके निसते

जयंतीनं गळफास लावून घितला व्हता देवघरात
ती देवाच्या खोलीत मेली
लटकून
माज्या नवऱ्याच्या घरात
तिनं किती केली तक्रार
किती रडली भाकली
कोरड्या सदाशिवप्पाला थोडी ओल दे म्हणून
तर देव पुरताच कोरडा त्याच्याहून
तो कुठून देतला ओल
जगातली सगळी ओल निसती बाईच्या नेत्रांत

मी हंबरले सवतीच्या मरणासाठी छाती पिटून रडले
तिच्या प्रेतावर वाह्यलेल्या कण्हेरीच्या फुलांसारके
लाल जाले माजे स्तन माज्या मुठी आदळून
0

३०.

भक्तीनी मळमळ होतेली घशात
मी नही करणार तुजं नामस्मरण चन्नमल्लिकार्जुना
अडवलं तर तुजा हात झटकून निगुन जायाची हितून
मी पाताळात गाडून घिणार नही
मी वाऱ्यावर उडून जाणार नही
मी कदलीबनात गुहेत हारवणार नही
उपास नही करणार व्रत नही करणार
पूजा तर सोडून टाकली कधीच
मी घाबरत नही देवाला घाबरत नही गावाला…!

आज्जीनं तोंडावर हात दाबला गच्च आणि गप म्हणतेली
म्हणतेली, आता जयंतीचे भाऊ तुजे तुकडे करतील यिवून
बांध चटकन कापडं, दागिने, पयसे दिसंल ते घ्ये
रातोरात पळ हितनं माज्याकडं बगू नको वळून

तव्हापासून
कारवार पणजी कोल्हापूर सोलापूर पंढरपूर
पायाला चाकं नेत्रांत भय मस्तकात राख दोन वर्षं.
0 0 0

निकिता मोनेच्या कविता

जन्म : १२ सप्टेंबर १९९७

सामाजिक संस्थेत पुनर्वसन झाल्यानंतर तिथून बाहेर पडून निकिता आता कायद्याचा अभ्यास करते आहे. न्यायाधीश होण्याचे तिचे स्वप्न आहे. सध्या ती बंगळूरू येथे वास्तव्यास असून कविता लेखनासोबत ओरिगामी आणि क्विलिंग हे तिचे आवडते छंद आहेत. कधीकधी ती चित्रंही काढते.  तिचा पत्ता / फोन ती उघड करू इच्छित नाही. तिच्या संपर्कासाठी माझा इमेल आयडी वापरू शकाल.
संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी आलेल्या पीडित व्यक्तींकडून लेखन करून घ्यायचे, असा एक प्रकल्प आम्ही आखला होता. त्यात प्रामुख्याने अनेकींनी डायरी लिहिली. कुणी एखादी कथा, काही लेख लिहिण्याचे प्रयत्न केले. या डायऱ्या देखील आम्ही एकत्र करत आहोत. निकिताच्या कविताही टप्प्याटप्प्याने इथे देण्यात येतील.

—————

१. सायकल

माझी कोणतीच सायकल
मी कोणाला देऊन टाकायला अलाव नाही केलं
सेलबील करायचा तर प्रश्नच नव्हता

पहिली सायकल तीन चाकी रेड
मी तेव्हा दोन वर्षांची होते
तिच्या बॅक सीटवर बसायचा माझा
गोल्डन टेडी

दुसरी सायकल होती वेगळी रेड
ममा त्याला गुलबक्षी कलर बोलायची
तिला दोन मोठी चाकं आणि
दोन लहान होती तोल सांभाळायला
सोसायटीच्या गेटच्या आतच
चालवणं अलाव होतं
बाहेर न्यायला अडवायचे वॉचमनअंकल
मग नुसतं गरागरा गोलगोल आतल्याआत
लाॅनवर सायकल अलाव नव्हतं
गवतातले नाकतोडे मात्र येऊन बसायचे
सायकलच्या हँडलवर

मग माझी उंची वाढली तेव्हा
मिळाली तिसरी ब्लू लेडीज सायकल
तिला एक बास्केट लावून
मी ममाला पटकन आणून देई
दुधाच्या पिशव्या, टोमॅटो, हिरव्या मिरच्या

सोळाव्या बर्थ डेचं गिफ्ट  म्हणून
पॅरेट ग्रीन सायकल चौथी
मला तेव्हा पाह्यजे होती पिंक स्कुटी
पपा म्हणाला, ते अठराव्या बर्थ डेचं गिफ्ट!

मला सायकलहून जास्त पाह्यजे होता स्पीड
खूप फास्ट खूप फास्ट खूप फास्ट
वाऱ्याशी शर्यत लावून निघून जायचं होतं
घराच्या बॉक्समधून
अनबॉक्स जिंदगी डोंगर नद्या धबधबे
समुद्र  आणि अनलिमिटेड आकाश
मी पळाले पपाची बाईक घेऊन

हरवला रस्ता, हरवलं घर – ममापपा
दुष्ट राक्षसांनी चोरून नेलं माझं डेअरिंग
त्यांच्या नखांचे ओरखडे खूप दिवस टिकले
माझ्या कॉन्फीडन्सवर
मला चालावंही नाही वाटत आता
हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर
स्टँडवर रांगेत लावलेल्या सगळ्या सायकली
मी पाडून टाकल्या जोरात धक्का मारून.

२. ओल्ड ब्लॅक आल्बम

नानी खूपवेळ आल्बम बघत बसते
मी चिडवते की ती आल्बमची अॅडिक्ट आहे
ओल्ड ब्लॅक आल्बम, डल व्हाइट ट्रेसिंग पेपर
गोल्डन लिटल काॅर्नर्स, त्यात सेपिया नाहीतर ब्लॅक फोटोज्

नानी म्हणते, आठवणी असतात फोटोंमागे!
पण फोटोंमागे तर असतो जस्ट ब्लॅक पेपर
कंटाळवाणा नुसता

आज नानीने मला एक माझा आल्बम दिला
त्यात फक्त माझे फोटोज् आहेत
मी ममाच्या कुशीत, नानीच्या मांडीवर,
पपाच्या हातात होते छोटुकलं क्युटी बाळ

एका फोटोत नाना झेलत होते मला उंच उडवून
एका फोटोत पपा करत होते घोडा घोडा
महेशअंकलच्या दोन्ही खांद्यांवरून पाय टाकून
त्याच्या टकलावर मी वाजवत होते खोटाखोटा तबला
एका फोटोत पंजा लढवत होते महेशअंकलसोबत
तो हरला असणार पक्का खोटाखोटा
एका फोटोत नानी नऊवारी नेसवून देत होती
गॅदरिंगमधल्या गोंधळ डान्समध्ये मी दुर्गा बनलेली
जीभ दुखली होती बाहेर काढून, पण हातातला त्रिशूळ बेस्ट होता
आणि खूप टाळ्या वाजवलेल्या सगळ्यांनी

मी खूपवेळ बघत बसले आल्बम नानीसारखाच
सगळ्यांचे स्पर्श आता फक्त फोटोंमध्ये
राह्यले आहेत शिल्लक
ममा नजर चुकवते, पपा दचकतो चुकून हात लागला तरी
अंगावर पाल पडल्यासारखा झटकतो हात
महेशअंकल पाहून हसतो कसाबसा, पण आता
आणत नाही कधीच खूप चोकोचिप्स घातलेलं आईस्क्रीम
नानांच्या डोळ्यांत नुसता जाळ
त्या जाळाने करपवून टाकली सगळी साय

मी कुठंही असले घरात तरीही
सगळीकडे सगळं करपल्याचा वास येतो
डोळ्यांत उडते अदृश्य राख आणि मग
डोळ्यांतून खूपवेळ खूप पाणी येतं.

शगुफ्ताच्या कविता ( २ )

५. पंख असतात

पंख असतात
त्यांना
नसतात हात
आणि त्यांचे पायही
असतात अत्यंत नाजूक

जे जपतात
केवळ हत्यारं
तीक्ष्ण नखांची
त्यांना चालता येत नाही
जमिनीवर नीट

पंखांनी स्वयंपाक करता येत नाही
घरं झाडता पुसता येत नाहीत
जमत नाही जळमटं काढणं
भांडी घासणं कपडे धुणं पंखांनी

पंखांनी विणकाम भरतकाम
करता येत नाही
घर सजवता येत नाही
पंखांनी कुणाचे पाय दाबता
येत नाहीत रात्रभर

पंखांनी उडून जाता येतं फक्त
दारं खिडक्या पिंजऱ्यातून
आणि पिलांना वाचवता येतं
उन्हाथंडीपावसात पंखाखाली घेऊन
शिकवता येतं त्यांना उडणं
आणि स्वसंरक्षण करणं
पुन्हा शिकवणं पुढच्यांना

उडणं निरुपयोगी वाटतं
त्या जीवांच्या पंखांचे हात बनतात
आणि उंच होतात त्यांचे पाय
विकसित होतो त्यांचा मेंदू
पंख छाटणे, जिभा कातरणे
पाळीव बनवणे यासाठी.

६. स्त्रियांना हवे असतात पुत्र 

कदाचित म्हणूनच स्त्रियांना
हवे असतात पुत्र
जितकी सत्ता सुनांवर गाजवता येते
तितकी लेकींवर नाही म्हणून

मी भांडते आईशी कडाडून
माझ्यात आहे तिचाच अंश
तिचीच प्रतिकृती आहे मी
तिच्याच क्षमता घेऊन जन्मलेली
तिनेच भाग पाडलं मला
तिचा विखारी मत्सर करायला
तिच्याशी सतत तुलना करवून
तिची स्पर्धक बनवून

तिला जमतं तसंच दमगोश्त
जमलं पाहिजे मला त्याच चवीचं
तिच्यासारखे उशांच्या शुभ्र अभ्र्यांवर
लाल बदाम आणि काळे बाण
भरता आले पाहिजेत सुबक
विड्यात पानं हलके नखलून
कातचुना लावून घातलं पाहिजे
इलायची, लवंग, सोप-सुपारी कतरी,
शुभ्र खोबरं, जेष्ठमध, जायपत्री,
गुलाबाच्या देसी पाकळ्या, कापूर,
कंकोळ, केशरकाड्या आणि
खसखस थोडी गुंगवणारी
प्रमाणात

तिच्यासारखे झाकता आले पाहिजेत केस
तिच्यासारखं लपवता आली पाहिजेत नखं
तिच्यासारखं जिभेला लाडिक वळण
देता आलं पाहिजे शब्द वेळावत बोलण्याचं
तिच्यासारखे पढता आले पाहिजेत
नियमित पाची नमाज
तिच्यासारखी घेत राहिली पाहिजे काळजी
आपला नवरा रोज रात्री आपल्याच
बिछान्यात येऊन झोपण्याची

आईने सुना निवडून आणल्या तसं
ती लेकींना निवडून आणू शकत नव्हती
म्हणून घडवत होती आपल्या साच्यात
ठाकूनठोकून बसवत
मुली जाणून असतात अंतर्बाह्य
आईचं मन आणि शरीर
मुलग्यांना कळत नाही ते त्यातूनच
पोसून बाहेर आले असले तरीही
म्हणून ते सापडतात कात्रीत
तसं मुली कधीच सापडत नाहीत कधीच
कारण त्या स्वत:च असतात
कात्रीची धारदार पाती
घेऊ पाहतात आईचं स्थान बळकावून
कदाचित म्हणूनच स्त्रियांना
नको असतात मुली.

७.  नाळ

बेंबीत उरलेलं नाळेचं मूळ गळून पडलं
तेव्हा मामीनं एक रोटी थापून ते तिच्यात घालून भाजलं
मग ती रोटी नेऊन सोडली यमुनेत
माशांनी खाल्ली माझी नाळ

तेव्हापासून आईने बेंबीच्या देठापासून
हाक मारली तरी ऐकू येत नाही मला
ऐकू येतो फक्त पाण्याचा खळखळाट
आणि बुडबुड्यांचं पुटपुटगाणं

दूध तोडलं की मुलीची बदलून जाते तहान
मी अकरा महिन्यांची होते तेव्हा
जन्मला माझा धाकटा भाऊ
आईचे स्तन त्याच्या मालकीचे झाले
दुधासकट
बदलली माझी भूक तेव्हापासून
तिच्या देहाबाहेरचं खाऊनपिऊन
माझी जीभ विसरली आयुष्यातली
पहिली चव स्वत:च्या रक्ताची
दुसरी चव आईच्या दुधाची

आईने जितका माझा तिरस्कार केला
शेवाळी भिंतींसारखा
फाटलेल्या बुरख्याइतका
तितकाच मीही केला तिचा

आता मुलीला वाढवताना
मला आठवतो सतत
आईचा अदृश्य शाप.

अचला कब्बूरच्या कविता

जन्म : २७ फेब्रुवारी १९८८

अचलाचे शिक्षण अपूर्ण राहिले असून तिने बीई करण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर जेमतेम दिड वर्ष ती शिकू शकली. सामाजिक संस्थेत पुनर्वसन झाल्यानंतर ती आता बाहेरून बी.कॉम. करते आहे; खेरीज संस्थेत आता पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून कामही करते आहे. वडलांच्या नोकरीत होणाऱ्या बदल्यांमुळे कर्नाटकासह महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि दिल्ली येथे तिचे वास्तव्य झाले. तिचा पत्ता / फोन ती उघड करू इच्छित नाही. तिच्या संपर्कासाठी माझा इमेल आयडी वापरू शकाल.
संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी आलेल्या पीडित व्यक्तींकडून लेखन करून घ्यायचे, असा एक प्रकल्प आम्ही आखला होता. त्यात प्रामुख्याने अनेकींनी डायरी लिहिली. कुणी एखादी कथा, काही लेख लिहिण्याचे प्रयत्न केले. या डायऱ्या देखील आम्ही एकत्र करत आहोत. अचला, वेदिका आणि मंजुषा या तिघींनी कविता लिहिल्या… आणि अजून लिहिताहेत. अश्विनी दासेगौडा – देशपांडे या कन्नड व मराठी दोन्हीही चांगले जाणणाऱ्या मैत्रिणीसह कवयित्रींसोबत बसून मी हे अनुवाद केले आहेत. ते टप्प्याटप्प्याने इथे देण्यात येतील.


१. मला वाटतं

मला वाटतं
माझ्या त्वचेतून साळूसारखे
खूप काटे एकदम
बाहेर काढता आले पाहिजेत

मला वाटतं
माझं सगळं अंग आणि डोकं
पाठीच्या ढालीखाली पटकन
लपवता आलं पाहिजे
कासवासारखं

मला वाटतं
माझे सगळे दात
सुळे बनले पाहिजेत
वाघासारखे तीक्ष्ण
आणि नखंही धारदार

मला वाटतं
बिबट्यासारखं लांब झेपा टाकत
मला अचानक दूर निघून
जाता आलं पाहिजे
किंवा झपकन झाडावर चढून
उंच शेंड्यावर बसता आलं पाहिजे

मला वाटतं
मला सापासारखं डसता आलं
पाहिजे जीव जाईल इतकं
किंवा पायाच्या बोटाचा
विषारी चावा कुरतडून
घुशीसारखं बिळात
घुसता आलं पाहिजे

मला वाटतं
कुणाचीच नजर
माझ्यावर पडू नये
मला वाटतं
कुणाचेच हात
माझ्यापर्यंत पोहोचू नयेत.

२. गोष्ट

रात्र गोष्ट सांगते
अंधाराची

गोष्टीत चांदण्या नसतात
चंद्र नसतो
आकाशगंगा नसतात

गोष्टीत असतं
एक कृष्णविवर
सगळी गाणी
त्यात जाऊन पडतात

गोष्ट संपत नाही
दिवसासुद्धा
अंधार भरून राहतो
दिवसासुद्धा
गोष्टीत अंधार
गोष्टीबाहेर अंधार

३. पेपर आणि कात्री 

मी रोज पेपर वाचते
कापून ठेवते बातम्या
किती बलात्कार झाले
किती खून झाले
किती लोक अपघातात
जागच्या जागी मेले
किती आत्महत्या
झाल्या कसकशा

मी रोज पेपर वाचते
कापून ठेवते जाहिराती
श्रद्धांजलीच्या
ज्यांची रोज आठवण
करतात नातेवाईक
ज्यांच्याशिवाय
पोकळी वाटते मित्रांना
ज्यांच्यासाठी आहेत
अश्रू आणि फुले

कापलेले कागद मी
ठेवून देते गादीखाली
खूप प्रेतं प्रेतांवर रचून
ठेवलीत आणि त्यावर
निजतंय अजून एक प्रेत
रोज रात्री

आईला सापडतात कागद
जाळून टाकते
काढून घेते कात्री
तरीही कात्री राहतेच खोलीत
बोटं कात्री जीभ कात्री
अढी घातलेले पाय कात्री
मी आणि आई देखील
एका कात्रीची दोन पाती

मला वाटतं
पृथ्वी आहे सपाट पेपर
मयताच्या बातम्या छापणारा.

४. चालणे 

प्रश्न गेले उडून
उत्तरं गेली बुडून
गप्प बस गप्प बस
काय होणार रडून?

अश्रूचा थेंब खारट
रक्ताचा थेंब खारट
समुद्रात अजून दोन
मिसळले समुद्र खारट

चटचट उचल पाय
चालत ऱ्हाय चालत ऱ्हाय
रस्ता नसो वाट नसो
थांबू नको चालत ऱ्हाय