संघमित्राच्या अजून काही कविता

१. फेसबुकाची भिंत 

 

वाशाला स्वप्नातपन दिसत राहती
फेसबुकाची भिंत
भिताडावरचे समदेच चेहरे त्याला बारक्या गोलातच
वळखू येतात आजकाल
येकाखाली येक झेंडूच्या माळेतल्या फुलावानी
लाईकचे निळे आंगठे, शेअरचे आकडे,
कॉमेंटा आणि रिप्लाय
चिडके रडके हासून दाताड काढके इमोजी
बगून बगून वाशाचं थोबाड कायम तांबडंभगवं
संतापलेल्या इमोजीवानी

झोपेत चिडचिड जागेत चिडचिड
आलान्यानं आशी पोस्ट टाकलीय
मंग फलाना तसल्या कॉमेंटा लिव्हायलाय
त्याच्यावर आमका आसा तुटून पडायलाय
त्या जातीचे लोकं आसलेच
या धर्माचे लोकं तसलेच
तमका तर पेड ट्रोल हाये, त्याचं
मनावर घ्यायचं नाही, तरी त्याची वाजवलीच पाह्यजे
त्याचं भिताड रंगीवलंच पाह्यजे
लाईक कॉमेंटा इमोजी रिप्लाय अनेंडिंग
अनेंडिंग अनेंडिंग अनेंडिंग

बापाचं नाव सांग बरं वाशा –
कावलेला आवाज पडतो कानी
पांघरून खसकन वढतं कोनी
वाशा डोळे चोळत खिनभर ब्ल्यांक होतो
मग तावातावानं भांडू लागतो
माजा बाप का काढला म्हणून
धाकल्या बह्यनीशीच

००

२. अनुभव

 

भाजताना भाकरी फुगते
तसा कवितेत फुगतो अनुभव.
लपत न्हाई काहीपन
बाजरीचा रंग, वास, चव
तसंच कवितेत अनुभव.

आता पुरनपोळीचं काय
तेलमांड्याचं काय
ब्रेडपावाचं काय
आसं नका इचारू कोनी
भाकरीसंगटच्या भाजीचं
आणि मिरचीच्या खर्ड्याचंबी नका इचारू
कांदा आनी मिठाचंबी नका.

भाकरी थापताना तळव्याची फुलं व्हतात.
भाकरी भाजताना बोटांच्या ज्वाळा व्हतात.
थप थप थप लय बनते कानात मनात
ती शब्दातनं आयकू यावी
जे कविता वाचतील त्यांना.
भूक भागावी मानसांची
भाकरीनं आनी कवितेनं.

००

३. कवित्रीचं घर 

 

वाचमनला पटवून लिफ्टमधनं झुप्कन
कवित्रीच्या घरला गेले कितव्या की मजल्यावरती
प्यासेजमदल्या फरशीवरबी दिसत व्हतं प्रतिबिंब
चकचक झकझक खोटी प्लास्टिकची झाडं
त्यावरती प्लास्टिकची फुलं 
त्यांच्यावरती प्लास्टिकचे दवबिंदू

किती खेपा वाजीवली दारावरची बेल
मग झोपाळू डोळ्यांनी कवित्रीनं उघडलं दार
आत अजून एक दार सोनेरी गज असलेलं
काय काम आहे म्हने म्हनाले मी तुमची फ्यान आहे
म्हने फोन का नाई क्येला
म्हनाले तुमाला प्रत्येक्ष बघायचं व्हतं
यीवू का घरात?

कन्फ्युज कवित्रीनं घरात नजर टाकली
उगडली दोन्ही दारं चपला आतच काड म्हनाली
प्लास्टिकच्या चपला माझ्या अंगभर धूळमाती
कसं टेकाव आपलं बुड जाडजूड सोफ्यावर कुत्रा झोपला व्हता
एक बाई चपात्या लाटत व्हती सयपाकखोलीत
एक बाई घर झाडत व्हती
मी म्हनाले मुतायला झालंय जोरात न्हानी कुठाय
नाक मुरडून कवित्रीनं न्हानीकडे नेलं
न्हानीतबी प्लास्टिकची फुलं रांगेत डब्याबाटल्या शांपूटांपूच्या
आतून आईकलं बाई लादी मागून पुसा पावनी गेल्यावरती
मोठ्या आरशात बगत मी बेसिनचंच पानी पिलं
आजून नको काही मागायला इकडं

भायेर आल्यावर म्हनाले
माझ्या कविता तुम्हाला वाचून दाखवायच्या व्हत्या
जास्त नाही एक दोन तरी आयकाल का?
ठेवून जा म्हणाली कवित्री
पन माझ्याकडं नव्हती झेरॉक्स नव्हते झेरॉक्सला पैसे
म्हनाले मग नंतर येते
तर व्हिजिटिंग कार्ड दिलं इमेल कर नाहीतर कुरियरनी पाठव
मी वाचून कळवेन सावकाश
आज जरा बिझी आहेय रजा टाकली कॉलेजात
इंटरन्याशनल सेमिनारचा पेपर लिहायचा आहे
ब्ल्याक कवित्री आणि दलित कवित्रीची कवितेची तुलना करनारा
माझे काळे डोळे चमकले
कुठं वाचायला मिळेल म्याडम?
इंग्लिशमध्ये असेल म्हनाली कवित्री

जात सारखी असली तरी वर्ग वेगळा आहे
मी म्हनले वाचमनला डोळा घालून
टॉवरम्होरच्या टपरीवर त्यानं चहा पाजला मला
तोबी आलता दुष्काळात हिकडं मराठवाड्यातनं

००

 

४. नव्या सालाचं मागनं 

 

भूक झाकायला भाकरी पाह्यजे
नाटक न्हाई करायचं भरल्या पोटाचं खोटं
डोकसं झाकायला पदर नको छप्पर पाह्यजे
जखम झाकायला मलमपट्टी
अत्याचार झाकायला न्याय पाह्यजे
अज्ञान झाकायला शिक्षन
गरिबी झाकायला नोकरी
दु:ख झाकायला आनंद पाह्यजे
मुकेपना झाकायला शब्द पाह्यजे
भावना झाकायला कविता
बेजबाबदारी झाकायला स्वातंत्र्यता पाह्यजे
नव्या सालात
पाह्यजे नवी नजर
पाह्यजे हातांना नवं बळ
पाह्यजे पायांना नक्की दिशा
विचारांना नवा मार्ग पाह्यजे
पाह्यजे ते स्वत: कमवायची
हिम्मत आनी कुवत पाह्यजे नव्या सालात

००

 

५. कविता

 

पोट रिकामं असताना
फक्त
कविता लिहिता येते
कवितेनं मन भरतं
पोट न्हाई
भरल्या मनानं निजलं
की भूक हाका मारत न्हाई

भुकेला कवितेचा कोंडा
निजेला कवितेचा धोंडा

००

 

 

त्यांच्या कविता : काही सुट्या नोंदी

अचला कब्बुर, वेदिका कुमारस्वामी, संघमित्रा काळे, निकिता मोने, शगुफ्ता, स्वरूपा रावल, माया अकोटकर, चिन्नाक्का, प्रेमला, गुलाब, चंद्रिका, शांता यांच्या कविता गेल्या काही महिन्यांत मी प्रथम फेसबुकवरून वाचकांसमोर ठेवल्या. या नावांमध्ये पुढील काळात अजून काही नावांची भर पडणार आहे. यात मूळ कविता आणि अनुवादित कविता असे दोन्ही प्रकार आहेत. अनुवाद केवळ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत, असा नेहमीसारखा सहज नव्हता; कारण हे बरंचसं लेखन मिश्र भाषांमध्ये, किमान चार ते पाच भाषांची सरमिसळ होत झालेलं होतं. त्यामुळे अनुवाद करताना देखील मूळ कवयित्री, दुसऱ्या भाषा जाणणारी अजून एखाददुसरी व्यक्ती यांना सोबत घेऊन केला. दोन भाषा आणि अनुवाद ही पारंपरिक चौकट यातून नकळत मोडली गेली होती. समूहाने लेखन, अनुवाद अशी कामं करता येऊ शकतात हे चळवळींची गीतं रचणाऱ्या लोकांना माहीत असतं; साहित्यिकांना कदाचित ते आक्षेपार्ह वा दुय्यम दर्जाचं वाटू शकतं. अशी मतं असणाऱ्या लोकांसाठी हे नाहीये.

मूळ कवितांवरही मी आशयाला धक्का लागू न देता संपादकीय संस्कार केले. ‘समवाय’ नावाचा एक ब्लॉगदेखील या कविता वाचकांना एकत्र वाचता याव्यात म्हणून मी तयार केला. ( अवांतर : असाच दुसरा ब्लॉग आदिवासी साहित्य / लोकसाहित्य / संस्कृती याविषयीचा देखील केलेला आहे आणि तिसरा माझ्या स्वतंत्र लेखनाचा ब्लॉग आधीपासून आहेच. ) ही नावं वाचकांना अपरिचित वाटल्याने ‘या कोण?’ अशी उत्सुकताही त्यांच्याविषयी निर्माण झाली आणि कवितांवर ( खेरीज या कवितांच्या निमित्ताने काही साहित्यबाह्य मुद्द्यांवर देखील ) बऱ्यापैकी चर्चा सुरू झाली.

कविता लिहिणं आणि आवडलेल्या कवितांचे अनुवाद करणं हे मी गेली तीस-बत्तीस वर्षं सातत्याने करत आले आहे. पुढे संपादनाची कामं करू लागल्यावर अनेक कवितासंग्रहांची संपादनंही केलेली आहेत. ‘भारतीय लेखिका’ या प्रकल्पात विविध  भारतीय भाषांमधल्या लेखिकांचा शोध घेतला, अनुवाद निवडले, निवडक पुस्तकांचे अनुवाद करून घेतले. स्वत:च्या लेखनासोबत अनुवाद व संपादन ही कामं आपली समज वाढवणारी ठरतात, हा त्यामागचा एक स्वार्थ. दुसरं म्हणजे चांगलं समकालीन लेखन वाचकांना उपलब्ध होतं आणि वाचकांच्या जाणिवाही त्यातून समृद्ध होऊ शकतात. माझे हेतू हे इतके साधे आणि स्वच्छ आहेत. प्रसिद्धी, पुरस्कार व पैसा हे तीन ‘अवांतर’ व ‘गैर’ हेतू आहेत, असंही काही लोकांना वाटतं; मात्र यातून ‘किती’ मिळतं हे वास्तव त्यांना ठाऊक नसतं, इतकाच याचा अर्थ. अशा लोकांकडे मी आता ठरवून दुर्लक्ष करायला शिकले आहे.
लिहिण्याखेरीजचं माझं दुसरं काम सामाजिक. आता प्रकृतीमुळे फिल्डवर्क पूर्ण बंद झालं असलं तरी टेबलवर्क सुरू असतंच. सामाजिक चळवळी आणि स्वयंसेवी संस्था यांच्यात कामं करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी गेली अनेक वर्षं मी लेखन शिबिरं घेतेय. डायऱ्या कशा लिहाव्यात, अहवाल कसे लिहावेत इथपासून ते कुणाला क्रिएटीव्ह लेखन करण्याबाबत काही प्रश्न मनात असतील तर त्यांचीही चर्चा या शिबिरांत होते. नमुना लेखन करवून घेतलं जातं. हिंदीतलं असं कार्यकर्त्यांनी मिळून लिहिलेलं एक पुस्तक ( आगीशी खेळताना ) मी अनुवादितही केलं आहे. ज्या संस्थांमध्ये पीडितांच्या पुनर्वसनाचं काम होतं, तिथं ‘मानसोपचारा’चा एक भाग म्हणून डायऱ्या, मनोगतं, कविता ‘लिहवून’ घ्यायचं… असेही काही उपक्रम आम्हीच नव्हे, तर इतरही अनेक संस्थांनी वेळोवेळी आखले आहेत. कधी या हकीकती ऐकून, वाचून त्यावर आधारित विविध फॉर्ममध्ये कार्यकर्त्यांनी ‘स्वतंत्र’ लेखनही केलेलं आहे; तर  कधी नुसतं शब्दांकन देखील. एड्स झालेल्या एका वेश्येचं ( मृत्यूमुळे ) अधुरं राहिलेलं आत्मचरित्र, बारबालांच्या आत्मकथा, हिजड्यांच्या डायऱ्या, लेस्बियन मुलींच्या डायऱ्या, तुरुंगात असताना कैद्यांनी लिहिलेल्या कविता व एकांकिका असा काही मजकूर मी वाचलेलाही आहे.

वाचकांपर्यंत या गोष्टी कितपत पोहोचतात हे अनेकदा प्रकाशकांवर अवलंबून असतं; खेरीज कविता, नाटक अशा फॉर्मना तुलनेत वाचक कमी असतो. त्यामुळे पूर्वी यातील जे प्रकाशित झालं आहे, ते वाचकांपर्यंत कितपत पोहोचलं आहे याची कल्पना नाही. ‘समवाय’ हा ब्लॉग तयार करण्यामागे ही पार्श्वभूमी होती.

लेखन वाचून समाज बदलतो, असे भाबडेपण आता माझ्यात शिल्लक नाही; तरीही वेगळी जगं लेखनातून खुली झाल्याने वाचकांची संवेदनशीलता, विचार करण्याची पद्धत, दृष्टी काही प्रमाणात का होईना पण बदलू शकते, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे वेगवेगळ्या फॉर्म्समधून वेगवेगळी जगं वाचकांसमोर आणली जावीत, अशी माझी भूमिका आहे. विविध कवयित्रींच्या कविता वाचकांना उपलब्ध करून देणं हा त्यातील एक भाग.

हे दोन्ही मुद्दे ‘मी’चं कौतुक करण्यासाठी सांगितलेले नाहीत. या कवितांवर आणि प्रकाशित करण्याच्या माझ्या हेतूंवर जे आक्षेप घेतले जात आहेत, त्यांना उत्तरं देत बसण्यात वेळ घालवायचा नाही, म्हणून एकदाच जाहीर करून टाकण्यासाठी सांगितलं आहे.
००

कविता म्हणजे स्फुट कविता हा एकच प्रकार सध्या मराठीत प्रामुख्याने लिहिला जात आहे. गझला लिहिणाऱ्या लोकांचे वेगळे गट आहेत, मात्र वर्षानुवर्षे ते एकच दळण दळताहेत; त्यामुळे त्यांचा विशेष विचार करावासा वाटत नाही. मधल्या काळात हायकू आणि चारोळ्या हे प्रकार आले – गेले. अभंग लिहिणारी पिढीही मागे राहिली. नाही म्हणायला दीर्घ कवितांची काही पुस्तकं आली; पण त्यातही दीर्घ कवितेची काही वैशिष्ट्ये असतात याचा विचार न करता केवळ अधिक ओळींची / लांबत गेलेली कविता म्हणजे दीर्घ कविता या ढोबळ धाटणीतून लिहिलेले बरेच दिसते. मालिका कविता देखील आल्या काही, त्याही हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या. पंचवीसहून अधिक कवितांचे प्रकार मराठीत होते; ते इतिहासात जमा झालेले आहेत. बाहेरून आलेल्या प्रकारात सुनीत, रुबाया टिकले नाहीत; गझल आणि हायकू टिकले. लोकगीतांच्या प्रभावातून काहींनी कविता लिहून पाहिल्या; त्याही वाचकांना विशेष भावल्या नाहीत.
त्यामुळे अजून कुणी काही वेगळं लिहितं आहे का, या शोधात असताना लोककथागीत या प्रकाराशी किंचित साधर्म्य दर्शवणारा कथाकविता हा प्रकार मला वेदिकाच्या कवितेतून सापडला.
असाच दुसरा मुद्दा होता लेखनविषयांचा. बहिणाबाई चौधरी यांच्यानंतर शेती व्यवसाय करणारी ( व ते जग कवितेतून मांडणारी ) कल्पना दुधाळ ही कवयित्री मधल्या पिढ्या ओलांडून आज लिहिताना दिसतेय. शेतकरी आंदोलनात स्त्रियांचा सहभाग मोठा होता, मात्र त्यातल्या कुणीच का ‘लिहित्या’ झाल्या नाहीत, हा एक प्रश्न आहेच. मुळातच कवींचे ‘व्यवसाय’ पाहिले, तर बहुतांश लोक शिक्षक-प्राध्यापक आहेत असं ध्यानात येतं. अनुभवांच्या अनेक जगांपासून मराठी कविता वंचित राहिलेली आहे, हे त्यातून जाणवतं.

कविता आणि उत्स्फूर्तता, कविता आणि भावना यांची सांगड कवितेला घातक ठरलेली आहे. विचार, अभ्यास, बैठक मारून लेखन करणं या ‘कविते’साठी करायच्या गोष्टी नसतात, असा एक रूढ पारंपरिक समज आहे. पुनर्लेखन, कवितेचे अनेक खर्डे तयार करणं, अनेक तऱ्हांनी – अनेक विषयांवर ‘लिहून पाहणं’ हे आपल्याकडे कवितेबाबत क्वचितच केलं जातं. अगदी ‘कवितेची कार्यशाळा’ घ्यायची गरज नाही, पण निदान कविता लिहिण्यातल्या अनेक शक्यता कवींपर्यंत आणि वाचकांपर्यंत पोचवण्यास हरकत काय? निदान चर्चा तर सुरू होतील.

शिकवून कविता लिहिता येत नसते, मात्र शिकवून कविता या साहित्य प्रकाराकडे किती पद्धतींनी पाहता येऊ शकतं हे समजू शकतं… यावर माझा विश्वास आहे. बहुतांश वाचकांना कवितेची ‘सवय’च नसते आणि ज्या मजकुराला ते कविता म्हणतात ते पाहता ते अद्याप कित्ते गिरवण्याच्या बाळबोध अवस्थेत आहेत, हे ध्यानात येतं. चांगल्या कविता त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्या का व कशा चांगल्या आहेत हे परिभाषेचा अतिरेक न करता साधेपणी सांगणं आणि यात सातत्य राखणं इतकाच यावर उपाय.
००

या कविता फेसबुक आणि ब्लॉगवर आल्यावर ज्या चर्चा झाल्या, त्यातले काही मुद्दे रोचक होते.

वेदिकेच्या कवितेतून एक कथा उलगडू लागली; तेव्हा ही ‘कविता’ आहे का? – अशी एक चर्चा सुरू झाली. कवितेत कथा असावी का, कवितेत आत्मचरित्र असावे का किंवा कथाकाव्य, चरित्रकाव्य, आत्मचरित्रकाव्य असे प्रकार असतात का? – असेही मुद्दे त्यातून पुढे आले.

दुसरा मुद्दा भाषेचा होता.
वेदिकाच्या कवितेतली विचित्र वाटणारी क्रियापदं, ‘पूर्ण ग्रामीण’ न वाटणारी भाषा, ‘अमुक प्रांतातील ग्रामीण’ असा निश्चित छाप मारता न येणारी भाषा, मधूनच येणारे इंग्लिश व संस्कृत शब्द यामुळे कुणीतरी ‘शहरी’ असलेली व्यक्ती ग्रामीण भाषा येत नसताना ‘चुकून’ हे सरमिसळीच्या भाषेत लिहीत आहे; असा संशय काही ‘अभ्यासकां’च्या मनात निर्माण झाला. विदर्भात असं नसतं, मराठवाड्यात तसं नसतं, खानदेशात अमुक, पश्चिम महाराष्ट्रात तमुक असे दाखले दिले जाऊ लागले. सोलापूरकडची कन्नड-मराठी मिश्र भाषा, कोल्हापूर – बेळगाव कडची कन्नडचा प्रभाव असलेली मराठी यांची उदाहरणे समोर येऊ लागली. काही शब्द, काही ओळी कानडीत असल्याने कर्नाटकाशी संबंधित वाचकांना उत्साहाचं भरतं येऊ लागलं आणि त्या बाबतची माहिती ते पुरवू लागले. फक्त टेबलवर्क करणाऱ्या भाषाभ्यासकांच्या तर्कांचा इथं फज्जा उडाला.
संघमित्राच्या कवितेतली मराठवाडी बोली काही वाचकांना यासाठी आक्षेपार्ह वाटली की, “सुशिक्षित असून बोलीभाषेत का लिहिता? असा गावंढळपणा ‘ठरवून’ करत असाल, तर त्यामागचं कारण काय?”
याच उलट दुसरा आक्षेप वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या कवितांवर होता… “त्यांच्या कवितांमध्ये प्रमाण भाषेतले शब्द कसे काय येऊ शकतात?”
भाषेचं समाजशास्त्र या विषयावर या चर्चांचा विस्ताराने विचार केला तर एक स्वतंत्र लेख होऊ शकेल, असं वाटलं.

ज्यांना मुळाक्षरं गिरवता येतात, सही करता येते, प्राथमिक स्वरुपात ठळक अक्षरांत लिहिलेलं वाचता येतं आणि प्रयत्नपूर्वक थोडं लिहिता येतं – असा वर्ग लिहू लागतो, तेव्हा त्याच्या कवितेची भाषा कशी असेल? स्त्रियांच्या भाषेचा स्वतंत्र अभ्यास आपल्याकडे कुणी केला आहे का? तो स्थळ व जातीनिहाय आहे का? स्त्रियांचा वर्ग व व्यवसाय यांचा त्यात काही विचार झाला आहे का? शब्द आणि म्हणी-वाक् प्रचार यांच्या याद्या नव्हेत; त्यापलीकडे जाऊन रीतसर भाशास्त्रीय पद्धतींनी केलेला अभ्यास! भाषा स्त्रियांनी विकसित केली, जतन केली, जोपासली; परभाषांच्या आक्रमणकाळात तिला माजघरात लपवून तिचं रक्षण त्यांनीच केलं… असं म्हणतात. त्यांची लोकगीतं, ओव्या, व्रतकथा इत्यादी मौखिक साहित्य अनेकांनी संकलित केलं आहे. त्या निमित्ताने थोडा भाषेचा अभ्यासही झालेला दिसतो. त्यापलीकडे दुर्लक्षच.

‘स्त्रिया’ असंच लिहितात, ‘स्त्रियां’नी असंच लिहायचं असतं, ‘स्त्रियां’नी असंच लिहावं इथपासून ते त्यांनी हे लिहू नये, याविषयी लिहू नये, अशा भाषेत लिहू नये, अमुक प्रतिमा वापरू नयेत असे उपदेश अजून किती पिढ्या केले जाणार आहेत? कविता वा कथा वा कादंबरी अशी लिहीत नसतात, क्रियापदं तशी वापरत नसतात, हे शब्द – या प्रतिमा कालबाह्य झालेल्या असल्यामुळे आज त्या वापरणं मागासपणाचं लक्षण आहे… हे अनेकांकडून सांगितलं जातं. उंबरठ्याबाहेरचं जग तुम्हाला ठाऊकच नाही, म्हणताना उंबरठ्याआतल्या जगाचं आपलं भलंमोठं अज्ञान आपण जाहीर करत आहोत, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. एरवी दुनियाभर कितीही उंडारलो तरी या उंबरठ्याआतल्या जगातच पुन:पुन्हा परत यावं लागतं, हे माहीत असूनही ते या जगाला क्षुल्लक लेखतात. उंबरठ्याआतल्या स्वयंपाकघराविषयी लिहिलं तर ते तुच्छ आणि बेडरूमविषयी लिहिलं तर असभ्य हेही त्यांनी ठरवून टाकलं आहे. स्त्रियांना काजवे समजून अशा अनेक लहान-लहान डब्यांमध्ये कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

त्यांचं लेखन चांगलं असेल तर ते त्यांनी स्वत: लिहिलेलंच नाही, असा आरोपही सरसकट होत आलेला आहे. पूर्वी वडील, भाऊ, नवरा यांनी लिहून दिलेलं असेल, असे आरोप होत; आता तिचा बायोडेटा शोधून ती अल्पशिक्षित, अशिक्षित असेल तर ‘अडाणी’ आहे असा निष्कर्ष काढून, एखाद्या प्रस्थापित लेखक-लेखिकेने हे लिहून दिलं असेल असं म्हटलं जातं. ज्यांचं साहित्याचं वाचन व अभ्यास नाही, त्यांना स्वबुद्धीने स्वतंत्र लेखन करता येणं शक्यच नाही; त्यांच्याकडे प्रतिभा कुठून असणार? कल्पनाशक्ती, रचनाकौशल्य कसं असणार? – असे प्रश्न लोक आजही विचारतात. बहिणाबाईंच्या कवितेची चर्चा करताना ‘त्या अशिक्षित असून…’ हे वाक्य आवर्जून येतंच.

हे सारं या सगळ्याजणींच्या कवितांच्या निमित्ताने थेट अनुभवायला मिळालं.

प्रत्यक्षात अशी गृहितकं असणारे लोक भाबडे, अज्ञानी, खुज्या कल्पनांच्या तावडीत सापडलेले आणि मर्यादित व बोथट विचार करणारे असतात. पठारावस्थेतलं साहित्य हेच खरं साहित्य म्हणण्याच्या नादात ते नव्या शिखरांची व नव्या दऱ्याखोऱ्यांची शक्यताच विसरून गेलेले आहेत. नाकारणं, दुर्लक्ष करणं, अलक्षित राहू देणं हे वेगळी नैतिकता मांडणाऱ्या स्त्रीसाहित्याकडे पाहण्याचे त्यांचे रूढ मार्ग आहेत.

प्रत्येक स्त्रीने आयुष्यात किमान एक तरी स्थलांतर अनुभवलेलं असतंच. त्यामुळे स्त्रियांच्या कवितेची भाषा ही स्थलांतरितांची भाषा असते. थोडक्यात सांगायचं तर ती ‘मिश्र’ असते. स्थलांतराचं स्वरूप व कारणं यावरून ही मिश्रता बदलते व कमीअधिक होते. संस्कृती, समाजातलं स्थान, आर्थिक दर्जा, भौगोलिक परिस्थिती इत्यादी अनेक घटकांच्या संदर्भातही भाषिक मिश्रणं होत आणि बदलत राहतात. स्त्रीचं पर्यावरण त्यामुळे वेगळं बनतं. इथं परिचित करून दिलेल्या कवयित्री अनेक स्थलांतरं अनुभवलेल्या अशा वेगळ्या पर्यावरणातल्या कवयित्री आहेत.

००

माणसं कसा विचार करतात? माणसांच्या भावना कशा असतात? माणसं कशी व्यक्त होतात? हेच प्रश्न स्त्री आणि पुरुष हे शब्द माणूस या शब्दाऐवजी वापरून विचारले, तर हमखास वेगळी उत्तरं मिळतात. स्त्रियांची भावना व्यक्त करण्याची एक निश्चित पद्धत असते आणि स्त्रियांच्या कवितेत विचाराला फारसं स्थान नसतं वा असलंच तर ते दुय्यम असतं. असं म्हणताना स्त्रियांचं सरसगटीकरण केलेलं दिसतं. मध्यमवर्गी व मध्यममार्गी स्त्रिया लिहीत होत्या तोवरचा हा विचार पुढच्या तीन पिढ्यांमध्येही अशाच स्त्रियांची संख्या जास्त असल्याने कंटिन्यू झाला. या स्त्रिया विशिष्ट नैतिकतेच्या होत्या, आहेत, असतात, असाव्यात असं मानलं गेलं आणि या स्त्रियांच्या कवितेनेही याच नैतिकतेचा पुरस्कार केला.
अगदी विद्रोहापोटी कुणा कवयित्रीने ‘व्यभिचार आवडतो’ असं लिहिलं आणि तिला आपलं हे विधान नैतिक चौकट मोडणारं, धक्कादायक आणि धाडसी वाटत असलं; तरी ती त्याच नैतिकतेला मानणारी ठरते. अन्यथा ‘व्यभिचार’ ही संकल्पना वा हा शब्द तिच्या लेखनात आलाच नसता. तिच्या दृष्टीने तो एक उचित आचार असता, तर तिने पहिल्या नैतिकतेतल्या संकल्पना वापरल्या नसत्या. असे विचार करण्याचे कष्टच न घेतल्याने विद्रोह मर्यादित व मिळमिळीत बनतात.

भिन्न नीतीच्या स्त्रिया पारंपरिक लोकांना अनैतिक वर्तन व विचार करणाऱ्या वाटू शकतात. जुन्या नीतीच्या चष्म्यातून असे विचार व कल्पना मांडणाऱ्या कवयित्री खोट्या व वरपांगी अनैतिकतेचा आभास निर्माण करणाऱ्या असतात. अस्सल अनीती ही फक्त भिन्ननीती असते.

ज्या कविता मी निवडल्या आहेत, त्यापैकी वेदिकाच्या कवितांचा संग्रह प्रकाशित करण्यासाठी मराठीतल्या काही मोठ्या व मान्यवर प्रकाशन संस्थांनी स्वत:हून रस दाखवला ही गोष्ट मला कवितेच्या जगातली एक स्वागतार्ह गोष्ट वाटली. देवदासी, धार्मिक वेश्या, वेगळ्या नैतिकतांचा आढावा आणि अजून काही मुद्दे घेत एक दीर्घ लेख त्या पुस्तकात कवितांसोबत प्रकाशित केला जाईल. काही महिन्यांत पुस्तक प्रकाशित होईल, त्यामुळे ते तपशील इथं टाळते आहे. मात्र स्त्रियांमधले जात, धर्म, वर्ग भेद या निमित्ताने थेट उलगडण्याचा प्रयत्न करते आहे. दुसरं पुस्तक वेश्यांनी लिहिलेल्या कवितांचं असेल. त्या कवितांसोबतही असाच एक दीर्घ लेख असेल. बाकी कवितांचं कदाचित संकलन करता येईल किंवा त्या ब्लॉगवरच राहतील.

 

००

 

‘आपण’ आणि ‘त्या’ असं सरळ सरळ विभाजन समाजात दिसत असलं तरी त्यांच्यातली सीमारेषा धूसर आहे. कुलीन, सभ्य, प्रतिष्ठित, औरस, विवाहबंधन मानणाऱ्या, एकनिष्ठ, पतिव्रता स्त्रिया ‘आपण’ स्त्रियांमध्ये मध्ये आणि कुलटा, चवचाल, बाजारबसव्या, रखेली, रांड, वेश्या, गावनवऱ्या, अखंड सौभाग्यवती, अनौरस, विवाहबंधन न मानणाऱ्या स्त्रिया दुसऱ्या बाजूला ‘त्या, तसल्या’ बायांमध्ये. आपण पहिल्या व त्या दुसऱ्या. सीमारेषा धूसर कशी? एक उदाहरण सांगते. ‘पहिल्या’तल्या स्त्रिया आई, बहीण, पत्नी, मुलगी, सून, मैत्रीण, प्रेयसी, सहकारी इत्यादी कोणत्याही नात्यातली वा ओळखीतली असो; तिला अपमानास्पद, तुच्छतापूर्ण वागणूक देण्यासाठी ‘दुसऱ्या’ स्त्रियांसाठी वापरली जाणारी संबोधनं वापरली जातात. आपल्याला व्यभिचारी, अनैतिक वर्तन करणारी, पापी स्त्री समजलं / संबोधलं जातंय ही कल्पनाही या पहिल्या स्त्रियांना सहन होत नाही. त्या संतापून भांडतात तरी किंवा ओशाळून रडतात तरी. आपलं ‘उच्च स्थान’ यामुळे घसरणीला लागतंय असं त्यांना वाटतं. इथं त्या केवळ पुरुषसत्ताक पद्धतीच्याच नव्हे, तर जात व धर्म या संस्थांच्या देखील बळी ठरतात.

 

दुसऱ्या बाजूने ‘दुसऱ्या’ स्त्रियांना माहीत आहे की, पहिल्या स्त्रियांहून आपण अनेक अर्थांनी आणि अनेक तऱ्हांनी वेगळ्या आहोत. त्यांचा राग फक्त परिस्थितीवर आणि पुरुषांवरच नसतो, तर या पहिल्या स्त्रियांवर देखील असतो. परिस्थिती अनेकदा हातात नसते, काही पुरुषांनी घृणा दर्शवली तरी असंख्य पुरुष लैंगिक गरज भागवायला त्यांच्याकडेच येतात ही जाणीव त्यांना आहे. मात्र या पहिल्या स्त्रिया देहव्यापारामुळे आपल्याला सर्वांत नीच समजतात, आपली निखळ घृणा करतात, याची खदखद त्यांच्या मनात असते. त्यातून त्या कधी यांच्या सभ्यतेचे बुरखे फाडतात, यांना आपले पुरुष आपल्याजवळच राखता येत नाहीत म्हणून ‘कमी’ लेखून हसतात, गृहिणी विद्रोह-विरोध करत नाही या मजबुरीची टिंगल करतात. काहींना यांच्या आर्थिक सुस्थिती, शिक्षण व प्रतिष्ठा यांचा हेवा वाटतो; तर काहींना आपण यांच्याहून अधिक स्वतंत्र आहोत असा भ्रमही होतो. गृहिणी आणि वेश्या अशा दोन्ही भूमिका समांतर निभावणाऱ्या देखील अनेकजणी आहेत; त्या दोन्ही जगांमधील चांगलं आणि वाईट ओळखून, पचवून तग धरून असतात. मात्र बहुतेकींच्या मनात तिरस्कार, घृणा, मत्सर, संताप या भावना प्रामुख्याने वसतात; प्रेमाला तिथं जागा नाही, वात्सल्याला मात्र निश्चितच आहे… आपली आई+मूल अशा आदिम कुटुंबाची जनुकीय आठवण त्या विसरू शकत नाहीत. या भावनांच्या गलक्यात ‘विचारां’ना स्थान मिळणं फारच अवघड; त्यांचं जगण्यातून आलेलं तत्त्वज्ञान आणि अध्यात्म मात्र त्यांच्या कवितांमधून निश्चित सापडतं… आणि ते पहिल्या स्त्रियांच्या कवितांमधील तत्त्वज्ञान आणि अध्यात्माहून पुष्कळच निराळं आहे.

 

पहिल्या विभागातल्या काही स्त्रिया अशा आहेत, ज्या राहतात पहिल्यांसोबतच आणि तरी त्यांना ‘दुसऱ्यां’सदृश्य मानलं जातं. बलात्कार झालेल्या स्त्रिया, कुमारीमाता, गरोदर विधवा, विधवा, घटस्फोटिता, अविवाहिता… इत्यादी. त्यांच्या कवितांमधून देखील पहिल्यांच्या जगाचे मुखवटे ओरबाडून फेकलेले दिसतात.
००
या कवितांच्या निमित्ताने साहित्यक्षेत्रातले लोक कवितेचा विचार कसा आणि किती करतात; कवयित्रींविषयी काय बोलतात; त्यांना कवितेहून कवीच्या लिंग-जात-धर्म-वय-वर्ग-व्यवसाय या गोष्टींमध्ये अधिक रस कसा आहे अशा अनेक गोष्टी लक्षात येऊ लागल्या. एकेकाचा दांभिकपणा दिसू लागला आणि मुखवटे उतरू लागले. अलिप्त राहून दूरवरून पाहणे हा दुसरा प्रकारही यावेळी दिसला. कवयित्रींचा अत्तापत्ता शोधण्यासाठी आपण हेर आहोत का, पोलीस आहोत का? – असा प्रश्न कुणालाही पडला नाही. ‘त्या कोण आहेत, कशा दिसतात?’ हे जाणून घेण्याचा आम्हांला वाचक म्हणून हक्क आहे… असे उबगवाणे मुद्दे समोर आले. ‘वेदिकाचा मुखडा दाखवा, तीस लाख देईन…’ अशी खुली ऑफरदेखील एकाने दिली. तिच्या कवितेतल्या लैंगिकतेची हिंस्र टवाळी करत कैक पुरुष वाचकांनी आपली पुरुषी वृत्ती दाखवून दिली. या प्रतिक्रियांचे स्क्रीन शॉट्स आमच्याकडे आहेत. सुदैवाने असे नमुने मोजकेच होते. दुसऱ्या बाजूने मोठ्या संख्येने वाचकांनी योग्य विचार व चांगल्या भावना मांडणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेकांनी उत्स्फूर्त अनुवाद केले. कविता मोठ्या प्रमाणात शेअर केल्या गेल्या. ही लोकप्रियताही अनेकांना खुपली आणि त्यातून पुन्हा ‘कवीचं मूळ’ शोधण्याचे उद्योग सुरू झाले. कवयित्रींना आपली ओळख लपवावी का वाटली वा टोपणनावाने का लिहावं वाटलं, याच्या अनेक उत्तरांपैकी एक उत्तर या प्रतिक्रियांमध्ये उघडंनागडं झालेलं दिसतं.

 

कवीची ‘ओळख’ कवितेच्या अभ्यासासाठी हवी असण्यास हरकत नसते. मात्र हा चरित्रपर समीक्षेचा विभागच आपल्याकडे नीट परिचित नाही; मग त्या विभागाचा विकास होणं ही तर फार दूरची गोष्ट आहे. त्यामुळे वाचकांना ही ओळख हवी असते ती केवळ पोकळ कुतूहल पूर्ण करण्यासाठी. जोवर असे अभ्यास व्यवस्थित सुरू होत नाहीत, तोवर या ओळखी अदृश्य राहिलेल्याच बऱ्या.

 

एक वस्तुस्थिती अशी असते की, मुलींची जन्मावेळी ठेवलेली गेलेली वा जन्मदाखल्यावर, शाळेत नोंदवली गेलेली जी नावं असतात, ती अगदी अपवादानेच मरेपर्यंत कायम राहतात. एका प्रकारातल्या स्त्रियांची नावं लग्नानंतर बदलली जातात आणि दुसऱ्या प्रकारातल्या स्त्रियांना कुटुंबाची अप्रतिष्ठा होईल या दडपणाखाली ती बदलावी लागतात. ज्या वेश्यांना सतत या शहरातून त्या शहरात फेकलं जातं, त्या फ्लाइंग क्वीन्सची नावंही शहरानुसार बदलतात. अशा स्थितीत कवयित्रीचं नाव हा मुद्दा फारच हास्यास्पद ठरू शकतो. काहींना आपली दैनंदिन जगण्यातली ओळख आणि लेखिका / कवयित्री म्हणून असलेली ओळख जाणीवपूर्वक वेगळी ठेवायची असल्याने, त्या टोपणनाव स्वीकारून लिहितात. आहे हे असं आहे.

 

००

काही मुद्दे मी ‘विचारा’साठी काढले आहेत. अनुभवांच्या पातळ्या आणि कवितेचा दर्जा याबाबत विचार करण्याचा प्रयत्न करते आहे; तो असा –

  • कवयित्रीचा अनुभव स्वत:चा आहे का?
  • अनुभव अगदी नजीकच्या / घरातल्या / गोतावळ्यातल्या / गावा-प्रांतातल्या / जाती-धर्मातल्या / समान लिंगाच्या / समभाषी व्यक्तीचा आहे का? घडलेल्या घटना स्वत: डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत का? किंवा संबंधित व्यक्तीने स्वत: सांगितलेल्या आहेत का? असे असेल तर तो अनुभव दुसऱ्या पातळीवरचा / दर्जाचा ठरतो.
  • अनुभवाची तिसरी पातळी अजून दूरस्थ बनते. यात ऐकलेल्या कहाण्या – गॉसिप – दंतकथा – हकीकती येतात; वाचलेली पुस्तकं, मासिकं, वृत्तपत्रं येतात; पाहिलेली चित्रं, छायाचित्रं, चित्रपट येतात.
  • चौथी पातळी ‘काल्पनिक’ असण्याची. तसं अनेकदा लेखक जाहीर करतात; कवींनी अद्याप असे खुलासे पुस्तकात केलेले दिसले नाहीत, ही आशादायी गोष्ट आहे. पुस्तकात जे काही घडलं होतं, घडतं आहे असं लिहिलेलं असतं ते पृथ्वीवर कुठेतरी प्रत्यक्षात – वास्तवात घडलं आहे की फक्त लेखक-कवीच्या मनात घडलं आहे? मनातच घडलेल्या गोष्टी ही अनुभवाची चौथी पातळी.

 

पहिल्या पातळीवरचं लेखन आपल्याकडे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. दुसऱ्या पातळीवर महत्ता कमी होते, पण कौतुक पुष्कळ शिल्लक असतं. तिसऱ्या  पातळीवरचे अनुभव आहेत असं समजलं तर वाचकांच्या मनातली लेखनाविषयीची विश्वासार्हता व सत्यतेबाबतची खात्रीची कल्पना उणावते. आणि चौथ्या पातळीवरचं लेखन सरळ ‘बाल’साहित्याच्या विभागात नेऊन फेकलं जातं.
विश्वासार्हता व सत्य मात्र हे दोन्ही चांगल्या कवितेसाठी आवश्यक घटक आहेत का? – असा एक प्रश्न त्यातून निर्माण होतो.

सत्य एक नसते, सत्यं अनेक असतात. कोणतेही लेखन शंभर टक्के वास्तवदर्शी / सत्य वा शंभर टक्के काल्पनिक / खोटं असूच शकत नाही; मग ती बातमी असो वा कविता.
– हे बहुसंख्य वाचकांच्या ध्यानात का येत नाही?

साहित्य वाचताना त्यात आपल्याला सगळं सत्य, सगळं वास्तव, सगळं खरं नेमकं कशासाठी हवं असतं? कल्पना, स्वप्नं, भ्रम, भास, चमत्कार यांना जीवनात खूप स्थान असलं तरी साहित्यात ते नको वा असल्यास तसं साहित्य दुय्यम असं का वाटतं? आत्मचरित्र हमखास खोटारडं आणि कादंबरी हमखास खरी असं समजण्याचा विरोधाभास आपल्यात नेमका का विकसित झाला आहे? लेखनातून, अगदी कवितेतूनही निखळ वास्तवाची अपेक्षा करणं कशातून आलं असेल? मीडियाने विश्वासार्हता गमावली आहे, इंटरनेटवरून माहितीचे लोंढे येत असले तरी ती अधिकृत म्हणवत नाही; अशा स्थितीत ‘फक्त पुस्तकं’ निश्चित सत्य सांगतील आणि योग्य माहिती देतील – असं लोकांना वाटतं आहे का? सत्य सांगणं, वास्तव दाखवणं व माहिती देणं याहून वेगळं काम कविता करत असते – याची जाणीव आजच्या बहुतांश मराठी वाचकांना नाही, असं ढोबळमानाने म्हणता येईल का? – अशा प्रश्नांची उत्तरं मी या कवितांच्या निमित्ताने शोधण्याचा प्रयत्न करते आहे.

 

कवितेची भाषा, अनुवादाचा दर्जा आणि कवयित्रींचा बायोडाटा हे तीन मुद्दे पूर्णपणे बाजूला ठेवून निखळपणे केवळ कवितेचा विचार इथं व्हावा, अशी अपेक्षा आहे.
०००

त्यांच्या कविता

देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांनी लिहिलेल्या एकूण २९ कवितांचा  अनुवाद इथे देत आहे.
या कवितांची भाषा मिश्र होती. रचनेवर किरकोळ संस्कारही केले आहेत, अर्थात आशयाला धक्का लागू न देता.

कवयित्री आहेत : चिन्नाक्का ( ५ कविता ), शांता ( ७ कविता ),  चंद्रिका ( ७ कविता ), गुलाब ( ५ कविता ), प्रेमला ( ५ कविता ).

चिन्नाक्का
——–

१.

आता तो
हस्तमैथुन करतानाही
धापा टाकतो
इतकं दुबळं बनलंय
त्याचं हृदय
प्रेमामुळे, तुझ्यामुळे
तू असं त्याच्या तोंडावर
दार आपटून
बंद करायला नको होतंस!
– त्याचा दोस्त म्हणवणारा
म्हणाला असं
आवाज कनवाळू करत
धंद्याच्या टायमाला

मग ब्ल्यू फिल्म पाहून तर
जोराचा हार्टअटक येवून
मरायलाच पाह्यजे होत्ता तो
आजपस्तोर निदान
बाराशे वेळा –
मी हासून म्हणाले
आणि विचारलं
बसणार आह्येस का तू
आसतील पैसे तर?

शेपूट आणि कनवाळूपणा
दोन्ही गांडीत घालून घेऊन
पळत सुटला
त्याचा दोस्त म्हणवणारा.
००

२.

आम्ही कपडे पाहतो
तुम्ही कातडी पाहता
इतकाच फरक

००

३.

पृथ्वीचा फोटो काढला चंद्रावरून
तर खूप डाग दिसतील
ते आम्ही नाहीत
तुम्ही आहात!

००

४.

खूप घाण साचली आहे
सगळं जग नरक झालंय
आणि सगळे जीव
निव्वळ किडे

००

५.

चावून चावून छातीतून रक्त आणलं
तेव्हा गोळे कापून टाकावेत वाटले
किती मलम लावलं
आग कमी नाही झाली
आभाळ भरून रडायला येतं
सगळी वस्ती बुडून जावी वाटती.

००

  1. शांता

१.

म्हातारी लिलू म्हणते
किती लिंगं बघितली मी आयुष्यात
जितकी नसतील या प्रुथ्वीवरती शिवलिंगं
मंदिरांमध्ये
धाकट्या भावाची इवलुशी नुन्नी
पाळण्यातून शूचं धनुष्य करणारी
आणि सावत्र बापाचा वरवंट्यासारखा बुल्ला
एकाच वयात मला माहीत झाला…
म्हातारी लिलू म्हणते…

००

२.

म्हातारी लिलू म्हणते
इथं मुलगी जन्मू नये, धंद्याला लावतात
इथं मुलगा जन्मू नये, दल्ला बनतो
इथं हिजडा जन्मू नये, भीकेला लावतो गुरू
पण आपलं कोणीतरी पाह्यजे ना दुनियेत
म्हणून हा कुत्रा पाळला…
म्हातारी लिलू म्हणते…

००

३.

म्हातारी लिलू म्हणते
पाट्यावर वाटलेल्या उडदाचे वडे
किती चवदार लागतात
आणि घरचा नारळ खवलून त्यात
परसातल्या मिरच्या खुडून घालायच्या
चटणी वाटायची दुधाळ
भरपूर कढीपत्ता घातलेली खमंग फोडणी
आजकाल नाकाला सगळे जुने वासच येतात
लहानपणीचे…
म्हातारी लिलू म्हणते…

००

४.

स्वच्छ कोऱ्या चादरीवर
एक रात्र निजायचंय एकदा
एकटीनं शांत
सगळ्या लाईटी बंद करून
म्हातारी लिलू म्हणते
स्वप्न बघत असल्यासारख्या डोळ्यांनी
पण जमवलेले पैसे वर्गणी देऊन टाकले
तिनं बिजलीच्या कफनासाठी
आता जमणार नाहीत पुन्हा कधी तितके
संपलेत तिचे हिशेब.

००

५.

नवऱ्याची वाट पाहणं
आणि गिऱ्हाईकाची वाट पाहणं
यात फरक काय असतो?
विचारते म्हातारी लिलू
विचारून गप्प बसते.

००

६.

झ्याटं पांढरीसफेद व्हवून मरशील
असा आशीर्वाद देऊ नये पोरींना
कुठं जाऊन पडतील हे नक्की
नसतं कोणालाच माहीत
म्हातारी लिलू म्हणते.

००

७.

आईच्या संदुकीत पितळेचा
पेढेघाटी डबा होता
त्याच्यातली सात पुतळ्यांची माळ
सासूच्या सासूपासून चालत आलेली
आईनं सुनेसाठी ठेवली
माझ्या गळ्यात बांधला दगड
त्यानं इथं आणून विकली मला
म्हातारी लिलू म्हणते.

००

  1. चंद्रिका

 

१.
आधी प्रेत म्हणून जन्मायचं
कपाळावर लाल मळवट
देहावर हिरवी चिंधी पांघरून
सरणावर झोपायचं
वाट पाहायची पेटवण्याची
धाडधाड आग भडकेल
ताडकन फुटेल कवटी
वाट पाहायची

पण ओततच नाही कोणी रॉकेल
म्हणून डोळे उघडून पाह्यलं
तर वेगळंच सरण
लाकडांसारखे रचलेले खाली
पुरुष
दोन्ही बाजूंना पुरुष वरती पुरुष
मग जळण्याची रीत रद्द
मरण्याची रीत रद्द
तरीपण जगायचं
तरीपण जळायचं
धगधग आग धकधक दिल
खिसा कर उलटा
मी कुलटा तर कुलटा

प्रेताची भीती वाटली नाही
की जित्याचीही भीती
वाटत नाही
००

२.

त्यांच्याकडे थोडे पैसे असतात
आणि एक उपाशी लिंग असतंय
मनात फक्त नाईलाज असतोय
बाकी काही नसतंय
ना दया ना प्रेम ना आकर्षण ना माणुसकी

आमच्याचसाठी नसतंय असंही नाहीये
घरच्यांसाठी जरी असतं
तरी ते इथं दिसले नसते
आणि ते आलेच नसते आमच्याकडे
पैसे, लिंग आणि नाईलाज घेऊन
तर आम्हीही इथं दिसलो नसतो.

००

३.
काल चार गिर्हाईकं आलती
आज अजून एकावरच अडलंय
तो एक उतरला
समोर साईबाबाच्या फोटोला
झाकलं होतं पँट लटकावून
ती अडकवली पायांत
चेन वर खेचून साईबाबाला
पुन्हा नमस्कार केला
आल्यावर केलताच दचकून

पँटमधून साईबाबाला दिसत असंल काय?
मी विचारलं तर जास्तीच दचकला
शर्ट तर काढलाच नव्हता
तो नीट इन केला
पँटच्या खिशातल्या पाकिटातनं पैसे दिले
साईबाबाला पैशांनी काही दिसलं नसंल काय?
० ०

४.
आधी एकेका रात्रीत सात-आठ गिर्हाईकं यायची
सिझनला तर दहा-बारा
वर्षभरात कमी झाली
आता तीन-चार
सिझनला एखादं जास्ती
येतात चढतात उतरतात जातात
मी कधी कोणाचं नाव विचारत नाही
कोणी कधी माझं नावगावफळफूल विचारत नाही

गावात एका रात्रीत सोळा चढले होते
रांग लावून
मग इकडं विकलं मला सोळातल्या पहिल्यानं
अजूनही येतो कधी फुकट चढायला
मुद्दाम सांगतो गावातल्या बातम्या
घरातल्यासुद्धा

गावात आमच्यांची तीन घरं होती
त्यांच्यांची बावीस
दोन मोठे रस्ते अठरा गल्ल्या तीन दुकानं
एक शाळा
सत्तावीस नक्षत्रांची नावं घडाघडा सांगितली
तेव्हा सर म्हणाले होते शाब्बास
गणितात पहिली आलते सातवीला
० ०

५.
काही दिसत नाही
मला कोणाचा चेहरा दिसत नाही
कोणाला माझा चेहरा दिसत नाही

एक गेला की दुसरा येण्याआधी
मी टॉवेलनं मांड्या पुसते नुसती
ओल दिसत नाही तरी असतेच

काही आठवत नाही सकाळी
न दिसलेलं
पैसेही आता अम्मा दारातच घेते
आधीच

मग पडायचं असतं उलथं नुसतं
आता वासही येत नाहीत नाकाला
ना जिभेला चव

सकाळी कपडे घालावे लागतात
हागायला खोलीतून बाहेर जायचं म्हणून
साडीच्या टिकल्या चमकतात

डोळे दुखतात उजेडानं

००

६.

जर पोटात पिशवी नसती
मांड्यांत भेग नसती
तर अल्लग राह्यली असती जिंदगी बायांची

जर मांड्यांत दांडू नसता पुरुषांच्या
तर आम्हाला सगळ्यांना
काहीतरी दुसरी कामं करता आली असती
पासलं पडल्याशिवाय

प्रत्येक जीवानं आपलं आपणच
अंडीपिल्ली जल्माला घालायची सोय असती
तर ही बायी हा पुरुष
असं झालं नसतं
आयी आणि बाप असे दोन शब्द नसते
एकच काहीतरी असता ईबा वगैरे

जर आणि तर हे भारी शब्द आहेत
त्यांच्यात खूप वेळ चांगला जातो
भारी करमणूक होते जीवाची.

००

७.

पण मला काही लपवायचंच नसंल तर?
आरे बाबा झुकेरबर्ग
मान खाली नको घालू
हे बघ माझ्या कातड्यावरले वाढत जाणारे तीळ
बघ माझ्या मांड्यांवरले विटकरी ठिपके सिगारेटच्या चटक्यांचे
ही जन्मखुण नाहीये
मी लाथा झाडत होते म्हणून तापलेली इस्त्री ठेवली होती पोटरीवरती
किती दिवस उभीपण राह्यले नाही नंतर
आडवी ती आडवीच
बघ बघ या पुच्चीत किती बुल्ले
पाणी वतून सुशेगाद गायब झाले
आहेत
बघ बाबा झुकेरबर्ग माझी कमाई
एका गिऱ्हाईकाचे आता मिळतेत कधी तीस कधी पस्तीस रुपये
धंद्यात वय लवकर जास्ती होतं
काय खाऊ किती पिऊ पार्टी करू
आय वॉन्ट टू ओपन एव्हरीथिंग
नागडं व्हते कपडे फेडून पटकन
हे बघ मायांग फाटू फाटू गेलं माझं
हे बघ आतड्याला पीळ पडला माझ्या
हे बघ पित्ताचे खडे काढायला जमत नाही अजून
हे बघ पिशवीत वाढायलाय ट्युमर नवा नवा
हे बघ सगळ्या नसा आखडू आखडू गेल्यात
हे बघ बसता येतच नाही मांडी घालून खाली
उभं ऱ्हा नाहीतर आडवं व्हा
आडवं व्हा आडवं व्हा आडवंच ऱ्हा
हे बघ नजर आन्धुक आन्धुक झाली माझी
तसं तरी बघायचं काय बाकी या दुनियेत?
हां आजून ती दोन हजाराची नोट नाही पाहिली मी
हे बघ औषधाच्या बाटलीवर कापलेला जीएसटी
हे बघ सगळं बघ निचिंतीनं बघ
हे बघ रक्ताच्या थारोळ्यात गर्भाचे तुकडे
खोलीतल्या खोलीत पोट पाडलं होतं गुपचूप
हे बघ तो सोनेरी नाकतोडा खुश आहे
निवड करताना भावताव करताना
त्याचं मोदीजाकीट बघ
धड पडलं वाटतं कचऱ्यात कोणाचं
डोकं उडालंय कुठं
पर्वा नाही पर्वा नाही
गाणं ऐक केशरिया बालमा…
ए बाबा झुकेरबर्ग
सांग माझं दुकान चालंल का?
फळी नाही लावत कधी चोवीस तास खुलं तुझ्या दुकानासारखं
गिर्हाईक आजतरी भेटल का चांगलं?
कसा वाढवू बिझनेस, वाढल का?
बोच्याची शपथ
झ्याट उपटून ठिवते तुझ्या तळहातावरती
डोळे बंद कर
फुंकर मार
इच्छा व्यक्त कर मनात
पूर्ण होणार म्हण मोठ्यानं
थांब जरा
आला खाकीवर्दिवाला फुकटचोद
त्याला नाही म्हणता येत नाही
वकील पण येतो एक पण तो याच्यासारखं
फुकट मागत नाही
मी तर एका न्यायाधीशाकडून सुद्धा पैसे घेतलेत वाजवून
न्याय तर मिळणार नसतो
पैसे का सोडा?
नकार कोणाला देत नाही कितीही कसाही असू दे
झुकेरबर्ग
हेही कर ओपन हे ही कर ओपन
माझ्या चड्डीचा रंग
आज आहे काळा
कर जाहीर
मला काहीच लपवायचं नाहीये.

००

 गुलाब

१.

बेंदाड भूत
लागली लूत
अत्तरमारीचा
उप्योग नाहीय्ये

गटार साफ करून आला तर
बायको घेत नाही उरावर
आणि मला काय
नाहीये नाक?

उलथ इथून
बेंदाड भूत

००

२.

तो खोटारडा म्हणालेला
की तो शाकाहारी आहे
त्यानं खाल्ले माझे ओठ चावून चावून
पिलं माझ्या डोळ्यांतलं रक्त
उठलं नाही त्याचं तर
अपयशानं संतापून
मारल्या बुक्क्या माझ्या मांड्यांमध्ये
खुपसली बोटं कचाकचा
टोचवली घाणेरडी नखं
म्हणाला, तो कधीच
वापरत नाही कण्डोम
बायकोनेही नऊ वेळा पोट पाडलंय
तिच्या भोकाचं भगदाड झालंय
म्हणून इथं येतो
तर काहीच जमत नाही इथल्या
घाणीत
कर प्रयत्न आणि आताही नाही उठलं
तर जीव घेईन तुझा!

मांसाहारीच असतात
शाकाहारी म्हणवणारे देखील.

००

३.

सुरमा घातलेल्या सुंदर डोळ्यांचा करीमबक्ष
त्याचं उंच मोठं कपाळ मध्येच काळा डाग असलेलं
अदबीनं झुकायाच्या त्याच्या लांबसडक
काळ्याझावळ्या पापण्या
चोरून पाहायची मी त्याच्या डोळ्यांतली वीज
माझ्या डोळ्यांत ढग जमा व्हायचे सारखे सारखे
रामरक्षा म्हण रामरक्षा म्हण
ओरडायची आई संध्याकाळी घाबरून
बाबांना सांगायची ड्रायव्हर बदलून टाका
त्यांना नव्हता वेळ असलं ऐकायला
करीमबक्षच्या ओठाच्या कोपऱ्यात बारीक हसू यायचं
आईला राग राग यायचा
रामरक्षा म्हणूनही झपाटलं मला भुतानं
चादर पडली जिंदगीवर

००

४.

मांडीत रोग शिरतो राजरोस
हसतात अनुभवी रांडा मी किंचाळते तेव्हा
तरीही मावशी घे म्हणते गिऱ्हाईक
वाट तुझे फोड वाट तुझा पू
वाट तुझं गटार तुंबलेलं
वाढू दे की तुंबारा दुनियाभर
मोठा मोठा व्हवू दे येकेक फोड
पृथ्वीयेवढा मोठा
फुटला की आकाशगंगा वाहील पिवळी
पडू दे तिच्यात गर्भाचे तुकडे मिसळू दे रक्त
मिसळू दे गु मुत घाणच घाण भेगांमध्ये
घाण दऱ्या घाण डोंगराचे सुळके
घाण गोरी गंगा पापानं थिजलेली
काळ्या यमुनेवर फेसच फेस पांढरा घाण
युगांचं धुणं धुवून टाकतात बायका
थुंकतात गरळ गुपचूप न गिळता

००

५.

वरडू नकोस हरामजादी
हळूहळू काढते गुंता
केस आधीच झाले विरळ
तुझ्या केसांतून कोणी कधी प्रेमानं
हात नाही फिरवणार
पण टकली झाली तर
फिरकणार नाही गिऱ्हाईक
फुकटसुद्धा

००

 प्रेमला

१.

मी कुसळय कुसळ… तुझ्या डोळ्यात घुसीन
मी मुसळय मुसळ… तुझा इगो ठेचीन
उखळाचा रोल करून करून
मी बोअर झालेय
जमिनीत गाडून घेऊन एकाचा कोपऱ्यात
मी बोअर झालेय

मी जाईन पळून कांडणारे हात घेऊन
कांडणाऱ्या हातांना सुद्धा आता
बोअर झालंय

सगळी मुसळं मसणात जाळा
कांडणारीचा देह काळानिळा
कोणी द्यावा कोणाला हात
आपल्याच साळी आहेत उखळा
गुपचूप व्हायचं दाढेखालचा भात

तरी म्हणायचं कांडताना गाणं
मी कुसळय कुसळ…

००

२.
गुपचूप गरोदर राहीन
उकंड्यावर बाळंत व्हईन
गंजक्या ब्लेडने कापीन नाळ
पोरगा जल्मला तर भडवा बनवीन
पोरगी जल्मली तर धंद्याला लावीन
पळून गेली पोरं वस्तीतून
बनली कोणी मोठी सायेब
तरी तुझं नाव लावणार नाहीत
तुला नसेल पत्ता तुला नसेल मालुमात
आणि तुझा वंश धंदा करेल गंदा
हीच तुझी सजा
मजा मारून विसरून गेल्याची

००

३.

तुला लाज नाही वाटत का? तिनं विचारलं
आणि झर्रकन मान फिरवली
आमच्यासारखी असती तर थुंकलीही असती
मी तिला नीट खालून वर बघितलं
मग वरून खाली बघितलं
बघितलं की लाजेनं बाईचं काय व्हतंय?

लाजत लाजत लग्न करायचं
लाजत लाजत कपडे घालायचे
लाजत लाजत कपडे काढायचे
लाजत लाजत पोट वाढवायचं
लाजत लाजत बाळंत व्हायचं
लाजत लाजत लेकराला पाजायचं
लाजत लेकीला लाजायला शिकवायचं
लाजत लाजत जेवायचं नवऱ्याच्या उष्ट्या ताटात
लाजत लाजत नोकरी करायची
लाजत लाजत सगळी कमाई घरात द्यायची
लाजत लाजत लपवायच्या खालेल्या शिव्या आणि मार
लाजत लाजत म्हातारं व्हायचं
लाजत लाजत दुखणं सोसायचं
लाजत लाजत मरून जायचं

मी म्हटलं तिला शेवटी
तुझा निर्लज्ज नवरा येतो माझ्याकडे
पण माझ्याऐवजी
त्याला विचारशील का जाब
की लाजशील अजून?
००

४.

मला सोडायचं तर कोर्टात
जावं नाही लागणार
मला सोडायचं तर पोटगी
द्यावी नाही लागणार
मला सोडायचं तर दु:ख नाही
मुलंबाळं दुरावल्याचं
मला सोडायचं तर अडणार नाही
घरसंसाराचा गाडा

मला सोडलं तर
वाचतील थोडे पैसे
खुश होईल लग्नाची बायको

फक्त मीच म्हणू शकते –
ना मी तुला धरलं होतं
ना तू मला धरलं होतं
मग सोडणार कोण कोणाला?
कोणाची सुटका होईल कोणापासून?
जाय जायचं तिकडं!

००

५.

नेहमी काळ खाजवीत नाही बगला
कधीकधी हालत पण कराकरा खाजीवते
सोलून काढते बाई कातडी
कोणाकोणाकरता काळ आहे तिथंच थांबतो
आणि परिस्थितीच नाचते थयथय उरावर
सगळ्यांना फक्त काळ करत नाही म्हातारं
परिस्थिती काळाला मागं टाकून पुढे पळते
सोळा वर्षांच्या पोरीला म्हातारं करून ती
बाद करून टाकते तिला जगण्यातून.

००

 

 

माया अकोटकरच्या कविता

जन्मदिनांक : १८ मे १९८९

मायाचे वैद्यकीय शिक्षण अधुरे राहिले, मात्र नंतर तिने एल. एल. बी. आणि एम. एस. डब्ल्यू. पूर्ण केले.

पीडित स्त्रियांच्या संस्थेत उपचारांचा भाग म्हणून डॉक्टरांनी डायरी लिहिण्यास सांगितले, तेव्हा मायाने आपण आधीपासून कविता लिहीत असल्याचे सांगितले. कवितांची डायरी तिच्यासोबत सर्व संघर्षात, धावपळीत सुखरूप होती. लेस्बियन असल्याचे घरच्यांना समजल्यावर माया आणि तिची मैत्रीण सुजाता या दोघींनाही त्यांच्या घरच्यांनी मारहाण करून कोंडून ठेवले. काही दिवसांनी ‘सुधारण्याचे’ आणि ‘घरचे सांगतील तसे वागण्याचे’ वचन देऊन त्यांनी पुन्हा कॉलेजला जाण्यास सुरुवात केली. मात्र सुजाताच्या लग्नाचा विचार सुरू झाल्यावर त्यांनी घरातून पळ काढला. दोघी १८ हून अधिक वयाच्या, सज्ञान होत्या. पण पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. ही विकृती मानून त्यांना संस्थेत दाखल करण्यात आले; तेव्हा दोघींच्याही शरीरावर गंभीर जखमा होत्या. संस्थेत त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि सहाय्य लाभले.

या सगळ्या त्रासातून गेल्यानंतर देखील मायाच्या कवितेत कुठेही कडवटपणाचा, नैराश्याचा अंश नाही. अत्यंत उत्कट प्रेमकविता आणि साध्या-सुंदर  निसर्गकविता ती लिहीत राहिली आहे. कविता म्हणून त्या काय दर्जाच्या आहेत, हा मुद्दा नंतरचा. जगण्यासाठीचा साध्या माणसांचा संघर्ष आणि सकारात्मक दृष्टिकोन या कोनातून मी मायाच्या कवितेकडे पाहते.

e mail : maya.akotkar@gmail.com


१.

गवताची हजार पाती
त्यावर दोघी
पहुडलेल्या

संथ वारा
मनात धाप
शब्द सुचेना

कुणी बोलावे?
तू की मी?
काय नेमके?

दोघींच्याही
वक्षावरती
उन्ह घोटाळे

उन्हात हसलो
आणि रडलो
बिलगलो

गवताची हजार पाती
नाचती
नाचती

०००

२.

प्रेम बनलं गुन्हा
मी तिच्यावर
केलं म्हणून
ती धर्मातली
जातीतली
पोटजातीतली
सुंदर
सुशिक्षित
श्रीमंत घरातली
माझ्यासारखीच
तरी ती ‘ती’ होती
‘तो’ नव्हती
म्हणून
गुन्हेगार दोघी
जमिनीला
पाठ टेकवून
आभाळाकडे
बघत
विचारत राहिलो
प्रश्न
मूकपणे
पक्ष्यांना
तर त्यांना
स्त्री पुरुष लग्न
हे शब्दच
नव्हते माहीत
पक्ष्यांना
माहीत नव्हत्या सीमा
आम्हीही पुसून टाकली
निरुपयोगी
माहिती
मेंदूतून

०००

३.

दिवस बदलतील
जसे ओघळतील
स्तन पोटावर
वृद्धपणी

तसाच तुझा
सरेल ताठा
तुझ्याकरिता
नुरेल कुणी

कसा करशील
सगळा प्रवास
सोबतचे शरीर
तुझ्यावाणी

घालता भीती
देता धमक्या
आणि म्हणता
करतो राखणी

जिथे प्रेम
तिथे नांदू
म्हणत हसलो
दोघीजणी

०००

४.

झाडाकडे पाहिलं नुसतं
आणि पानं उडून गेली
हजारो भुंगे बनून
गुणगुणत गुणगुणत

फुलं गळली नुसती
जसा मध गळावा
सोनेरी पोळ्यातून
टपटपत टपटपत

गोड वास सगळीकडे
मधुर मधुर मध
जीभ फिरताना
आतून बाहेरून

माळावर उघडा
काळा कातळ
झाला जांभळा
रंग बदलून

०००

५.

पांगाऱ्याची फुलं
केसांत माळायची
तर म्हणे आधी
उन्ह नेसून ये
अट आहे समज…

मीही म्हणाले
माझा निखारा
जिभेवर ठेवायचा
तर सगळे शब्द
विसरून ये
अट आहे समज…

माझ्या कानाची
पाळी तापून लाल
त्याचे डोळे खुळे
शांत खोल निळे
अटी गेल्या जळून
आग घेतली पिऊन…

०००

६.

ओठांत अमृत नसते
की अमर व्हावं
एक थेंब पिऊन
असते मदिरा
की पित राहा
हो व्यसनाधीन
मरून जा
मरताना आठव
चुंबन!

०००

७.

पाच पाकळ्यांमध्ये
परागाच्या देठाखाली
अंधारात
जिथं गडद गडद होतो
जास्वंदीच्या पाकळ्यांचा
लाल रंग
काळसर लाल
तिथं
मी टेकवेन जिभेचं टोक
घेईन चोखून.

०००

८.

उंच
पाईनच्या
झाडांमधून
फिरताना
पायांखाली
लाखो सुया
काही हिरव्या
काही पिवळ्या
सुयांवरून
घसरून
पडलो
तर
दंशच दंश
देहभर
धरून चालू
एकमेकींना
घट्ट.

०००

९.

मी तुझ्याशी खोटं बोलेन
आणि चोखेन
तुझ्या ओठांतला निखारा
बर्फासारखा.

०००

१०.

जंगलातून फिरताना
झालो हिरव्या जंगली
तुझ्या देहावरची ही
हिरव्या कवडशांची नक्षी
मी कशी लिहू?

०००

११.

खूप पाऊस कोसळतो
म्हणता येत नाही थांब
कडाडून वाजते थंडी
तिला ढकलता येत नाही दूर
घशात टोचते किंकाळी
तिला कशी रोखू?

… लवकर ये तू.

०००

शगुफ्ताची कविता – ३

तलाक मिळून माहेरी परतलेल्या
नणंदेसारखी सकाळ
गोरी, देखणी आणि चिडचिडी
विचारलं, ‘काय नाश्ता बनवू?’ तर म्हणते,
‘बनव, काही येत असेल बनवता तर!’
नाही विचारलं, तर म्हणते,’ अदब नाही.
विचारून करण्याची रीतभात
हिला हिच्या आईने शिकवली नाही.
साधा पाव्हण्यांचा आदरसत्कार जमत नाही. ‘
मोलकरणीला म्हटलं,’स्वच्छ झाड गेस्टरूम’
ऐकून म्हणे,’पाहुणी नाही मी
माझ्या भावाचं घर आहे, तू तर मागून आलेली.’

सकाळ बोचकारत राहते शेजाऱ्यांच्या
पांढऱ्या मांजरीसारखी
तरी शेजारधर्म म्हणून मी देते तिला वाडगाभर दूध

सूर्य तापेल आकाश लाल होईपर्यंत
मग आदळेल काळोख धपकन
‘भुसा भरलेले पराठे खाऊ घालते वहिनी,’
जेवताना कुरकुरेल रात्र
‘स्वयंपाकघरातच निजणार आहेस का?’
खेकसेल नणंदेचा भाऊ येरझारा घालत

 

उजेडाआधी उठून, डोक्यावर गार पाणी ओतत न्हाऊन
मी घुसेन पुन्हा स्वयंपाकघरात
आळसावत जागी होऊन मागाहून आत आलेली सकाळ
न्याहाळेल पुन्हा मला जळजळीत नजरेने नखशिखान्त
माझे ओलेते केस पाहून मत्सराने पुटपुटेल,
‘तमीज नाही हिला जराही!’

 

वेदिका कुमारस्वामीच्या कविता

जन्मदिनांक : १३ जुलै

पीडित स्त्रियांना संस्थेत उपचारांचा भाग म्हणून डॉक्टरांनी डायरी लिहिण्यास सांगितले, तेव्हा अचला, वेदिका आणि मंजुषा या तिघींनी कविता लिहिल्या.  वेदिका द्वैभाषिक असल्याने तिच्या काही कविता कन्नड आणि काही कन्नडमिश्र मराठीत होत्या. अश्विनी दासेगौडा – देशपांडे या कन्नड व मराठी दोन्हीही चांगले जाणणाऱ्या मैत्रिणीसह, कवयित्रींसोबत बसून मी हे संपादन केले आहे.

देवदासींच्या आयुष्याची कथा तुकड्या-तुकड्याने तिने या कवितांमधून सांगितली आहे. मागासवर्गातून आलेल्या देवदासी या देवळात स्वच्छता इत्यादी कामे करतात आणि नृत्यादी कलांमध्ये पारंगत असलेल्या देवदासी एखाद्या श्रीमंत पुरुषाने ठेवलेली बाई म्हणून राहतात. अशा कलावंत कुटुंबातील एका मुलीची झालेली वाताहत या कवितांमधून उलगडत जाते.

जुनी कथाकाव्ये अथवा लोककथागीते असावीत, तशी धाटणी या कवितांची आहे. एका चक्रातून भिरभिरत त्या पुन:पुन्हा त्याच त्याच जागी येत आलटून पालटून कथेचे अंश तुकड्यातुकड्याने  सांगतात. त्यामुळे काहीवेळा पुनरावृत्तीचा आभास निर्माण होतो, तरी ते तुकडे नीट जुळवून पाहिले तर पुनरावृत्ती जाणवत नाही. असा पुनरावृत्तीचा आभास लोककथागीतांमधून आढळत असतो.

e mail : vedhickakumarswami@yahoo.com


वेदिकाच्या कवितांचा संग्रह ‘गावनवरी’ या शीर्षकाने पॉप्युलर प्रकाशनाकडून या महिन्यात प्रकाशित होत आहे.
त्यामुळे ‘समवाय’वरील तिच्या कविता काढून घेतल्या आहेत. त्या सर्व कविता आता संग्रहात सलग वाचण्यास मिळतील.

 

निकिता मोनेच्या कविता

जन्म : १२ सप्टेंबर १९९७

सामाजिक संस्थेत पुनर्वसन झाल्यानंतर तिथून बाहेर पडून निकिता आता कायद्याचा अभ्यास करते आहे. न्यायाधीश होण्याचे तिचे स्वप्न आहे. सध्या ती बंगळूरू येथे वास्तव्यास असून कविता लेखनासोबत ओरिगामी आणि क्विलिंग हे तिचे आवडते छंद आहेत. कधीकधी ती चित्रंही काढते.  तिचा पत्ता / फोन ती उघड करू इच्छित नाही. तिच्या संपर्कासाठी माझा इमेल आयडी वापरू शकाल.
संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी आलेल्या पीडित व्यक्तींकडून लेखन करून घ्यायचे, असा एक प्रकल्प आम्ही आखला होता. त्यात प्रामुख्याने अनेकींनी डायरी लिहिली. कुणी एखादी कथा, काही लेख लिहिण्याचे प्रयत्न केले. या डायऱ्या देखील आम्ही एकत्र करत आहोत. निकिताच्या कविताही टप्प्याटप्प्याने इथे देण्यात येतील.

—————

१. सायकल

माझी कोणतीच सायकल
मी कोणाला देऊन टाकायला अलाव नाही केलं
सेलबील करायचा तर प्रश्नच नव्हता

पहिली सायकल तीन चाकी रेड
मी तेव्हा दोन वर्षांची होते
तिच्या बॅक सीटवर बसायचा माझा
गोल्डन टेडी

दुसरी सायकल होती वेगळी रेड
ममा त्याला गुलबक्षी कलर बोलायची
तिला दोन मोठी चाकं आणि
दोन लहान होती तोल सांभाळायला
सोसायटीच्या गेटच्या आतच
चालवणं अलाव होतं
बाहेर न्यायला अडवायचे वॉचमनअंकल
मग नुसतं गरागरा गोलगोल आतल्याआत
लाॅनवर सायकल अलाव नव्हतं
गवतातले नाकतोडे मात्र येऊन बसायचे
सायकलच्या हँडलवर

मग माझी उंची वाढली तेव्हा
मिळाली तिसरी ब्लू लेडीज सायकल
तिला एक बास्केट लावून
मी ममाला पटकन आणून देई
दुधाच्या पिशव्या, टोमॅटो, हिरव्या मिरच्या

सोळाव्या बर्थ डेचं गिफ्ट  म्हणून
पॅरेट ग्रीन सायकल चौथी
मला तेव्हा पाह्यजे होती पिंक स्कुटी
पपा म्हणाला, ते अठराव्या बर्थ डेचं गिफ्ट!

मला सायकलहून जास्त पाह्यजे होता स्पीड
खूप फास्ट खूप फास्ट खूप फास्ट
वाऱ्याशी शर्यत लावून निघून जायचं होतं
घराच्या बॉक्समधून
अनबॉक्स जिंदगी डोंगर नद्या धबधबे
समुद्र  आणि अनलिमिटेड आकाश
मी पळाले पपाची बाईक घेऊन

हरवला रस्ता, हरवलं घर – ममापपा
दुष्ट राक्षसांनी चोरून नेलं माझं डेअरिंग
त्यांच्या नखांचे ओरखडे खूप दिवस टिकले
माझ्या कॉन्फीडन्सवर
मला चालावंही नाही वाटत आता
हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर
स्टँडवर रांगेत लावलेल्या सगळ्या सायकली
मी पाडून टाकल्या जोरात धक्का मारून.

२. ओल्ड ब्लॅक आल्बम

नानी खूपवेळ आल्बम बघत बसते
मी चिडवते की ती आल्बमची अॅडिक्ट आहे
ओल्ड ब्लॅक आल्बम, डल व्हाइट ट्रेसिंग पेपर
गोल्डन लिटल काॅर्नर्स, त्यात सेपिया नाहीतर ब्लॅक फोटोज्

नानी म्हणते, आठवणी असतात फोटोंमागे!
पण फोटोंमागे तर असतो जस्ट ब्लॅक पेपर
कंटाळवाणा नुसता

आज नानीने मला एक माझा आल्बम दिला
त्यात फक्त माझे फोटोज् आहेत
मी ममाच्या कुशीत, नानीच्या मांडीवर,
पपाच्या हातात होते छोटुकलं क्युटी बाळ

एका फोटोत नाना झेलत होते मला उंच उडवून
एका फोटोत पपा करत होते घोडा घोडा
महेशअंकलच्या दोन्ही खांद्यांवरून पाय टाकून
त्याच्या टकलावर मी वाजवत होते खोटाखोटा तबला
एका फोटोत पंजा लढवत होते महेशअंकलसोबत
तो हरला असणार पक्का खोटाखोटा
एका फोटोत नानी नऊवारी नेसवून देत होती
गॅदरिंगमधल्या गोंधळ डान्समध्ये मी दुर्गा बनलेली
जीभ दुखली होती बाहेर काढून, पण हातातला त्रिशूळ बेस्ट होता
आणि खूप टाळ्या वाजवलेल्या सगळ्यांनी

मी खूपवेळ बघत बसले आल्बम नानीसारखाच
सगळ्यांचे स्पर्श आता फक्त फोटोंमध्ये
राह्यले आहेत शिल्लक
ममा नजर चुकवते, पपा दचकतो चुकून हात लागला तरी
अंगावर पाल पडल्यासारखा झटकतो हात
महेशअंकल पाहून हसतो कसाबसा, पण आता
आणत नाही कधीच खूप चोकोचिप्स घातलेलं आईस्क्रीम
नानांच्या डोळ्यांत नुसता जाळ
त्या जाळाने करपवून टाकली सगळी साय

मी कुठंही असले घरात तरीही
सगळीकडे सगळं करपल्याचा वास येतो
डोळ्यांत उडते अदृश्य राख आणि मग
डोळ्यांतून खूपवेळ खूप पाणी येतं.

शगुफ्ताच्या कविता ( २ )

५. पंख असतात

पंख असतात
त्यांना
नसतात हात
आणि त्यांचे पायही
असतात अत्यंत नाजूक

जे जपतात
केवळ हत्यारं
तीक्ष्ण नखांची
त्यांना चालता येत नाही
जमिनीवर नीट

पंखांनी स्वयंपाक करता येत नाही
घरं झाडता पुसता येत नाहीत
जमत नाही जळमटं काढणं
भांडी घासणं कपडे धुणं पंखांनी

पंखांनी विणकाम भरतकाम
करता येत नाही
घर सजवता येत नाही
पंखांनी कुणाचे पाय दाबता
येत नाहीत रात्रभर

पंखांनी उडून जाता येतं फक्त
दारं खिडक्या पिंजऱ्यातून
आणि पिलांना वाचवता येतं
उन्हाथंडीपावसात पंखाखाली घेऊन
शिकवता येतं त्यांना उडणं
आणि स्वसंरक्षण करणं
पुन्हा शिकवणं पुढच्यांना

उडणं निरुपयोगी वाटतं
त्या जीवांच्या पंखांचे हात बनतात
आणि उंच होतात त्यांचे पाय
विकसित होतो त्यांचा मेंदू
पंख छाटणे, जिभा कातरणे
पाळीव बनवणे यासाठी.

६. स्त्रियांना हवे असतात पुत्र 

कदाचित म्हणूनच स्त्रियांना
हवे असतात पुत्र
जितकी सत्ता सुनांवर गाजवता येते
तितकी लेकींवर नाही म्हणून

मी भांडते आईशी कडाडून
माझ्यात आहे तिचाच अंश
तिचीच प्रतिकृती आहे मी
तिच्याच क्षमता घेऊन जन्मलेली
तिनेच भाग पाडलं मला
तिचा विखारी मत्सर करायला
तिच्याशी सतत तुलना करवून
तिची स्पर्धक बनवून

तिला जमतं तसंच दमगोश्त
जमलं पाहिजे मला त्याच चवीचं
तिच्यासारखे उशांच्या शुभ्र अभ्र्यांवर
लाल बदाम आणि काळे बाण
भरता आले पाहिजेत सुबक
विड्यात पानं हलके नखलून
कातचुना लावून घातलं पाहिजे
इलायची, लवंग, सोप-सुपारी कतरी,
शुभ्र खोबरं, जेष्ठमध, जायपत्री,
गुलाबाच्या देसी पाकळ्या, कापूर,
कंकोळ, केशरकाड्या आणि
खसखस थोडी गुंगवणारी
प्रमाणात

तिच्यासारखे झाकता आले पाहिजेत केस
तिच्यासारखं लपवता आली पाहिजेत नखं
तिच्यासारखं जिभेला लाडिक वळण
देता आलं पाहिजे शब्द वेळावत बोलण्याचं
तिच्यासारखे पढता आले पाहिजेत
नियमित पाची नमाज
तिच्यासारखी घेत राहिली पाहिजे काळजी
आपला नवरा रोज रात्री आपल्याच
बिछान्यात येऊन झोपण्याची

आईने सुना निवडून आणल्या तसं
ती लेकींना निवडून आणू शकत नव्हती
म्हणून घडवत होती आपल्या साच्यात
ठाकूनठोकून बसवत
मुली जाणून असतात अंतर्बाह्य
आईचं मन आणि शरीर
मुलग्यांना कळत नाही ते त्यातूनच
पोसून बाहेर आले असले तरीही
म्हणून ते सापडतात कात्रीत
तसं मुली कधीच सापडत नाहीत कधीच
कारण त्या स्वत:च असतात
कात्रीची धारदार पाती
घेऊ पाहतात आईचं स्थान बळकावून
कदाचित म्हणूनच स्त्रियांना
नको असतात मुली.

७.  नाळ

बेंबीत उरलेलं नाळेचं मूळ गळून पडलं
तेव्हा मामीनं एक रोटी थापून ते तिच्यात घालून भाजलं
मग ती रोटी नेऊन सोडली यमुनेत
माशांनी खाल्ली माझी नाळ

तेव्हापासून आईने बेंबीच्या देठापासून
हाक मारली तरी ऐकू येत नाही मला
ऐकू येतो फक्त पाण्याचा खळखळाट
आणि बुडबुड्यांचं पुटपुटगाणं

दूध तोडलं की मुलीची बदलून जाते तहान
मी अकरा महिन्यांची होते तेव्हा
जन्मला माझा धाकटा भाऊ
आईचे स्तन त्याच्या मालकीचे झाले
दुधासकट
बदलली माझी भूक तेव्हापासून
तिच्या देहाबाहेरचं खाऊनपिऊन
माझी जीभ विसरली आयुष्यातली
पहिली चव स्वत:च्या रक्ताची
दुसरी चव आईच्या दुधाची

आईने जितका माझा तिरस्कार केला
शेवाळी भिंतींसारखा
फाटलेल्या बुरख्याइतका
तितकाच मीही केला तिचा

आता मुलीला वाढवताना
मला आठवतो सतत
आईचा अदृश्य शाप.

अचला कब्बूरच्या कविता

जन्म : २७ फेब्रुवारी १९८८

अचलाचे शिक्षण अपूर्ण राहिले असून तिने बीई करण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर जेमतेम दिड वर्ष ती शिकू शकली. सामाजिक संस्थेत पुनर्वसन झाल्यानंतर ती आता बाहेरून बी.कॉम. करते आहे; खेरीज संस्थेत आता पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून कामही करते आहे. वडलांच्या नोकरीत होणाऱ्या बदल्यांमुळे कर्नाटकासह महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि दिल्ली येथे तिचे वास्तव्य झाले. तिचा पत्ता / फोन ती उघड करू इच्छित नाही. तिच्या संपर्कासाठी माझा इमेल आयडी वापरू शकाल.
संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी आलेल्या पीडित व्यक्तींकडून लेखन करून घ्यायचे, असा एक प्रकल्प आम्ही आखला होता. त्यात प्रामुख्याने अनेकींनी डायरी लिहिली. कुणी एखादी कथा, काही लेख लिहिण्याचे प्रयत्न केले. या डायऱ्या देखील आम्ही एकत्र करत आहोत. अचला, वेदिका आणि मंजुषा या तिघींनी कविता लिहिल्या… आणि अजून लिहिताहेत. अश्विनी दासेगौडा – देशपांडे या कन्नड व मराठी दोन्हीही चांगले जाणणाऱ्या मैत्रिणीसह कवयित्रींसोबत बसून मी हे अनुवाद केले आहेत. ते टप्प्याटप्प्याने इथे देण्यात येतील.


१. मला वाटतं

मला वाटतं
माझ्या त्वचेतून साळूसारखे
खूप काटे एकदम
बाहेर काढता आले पाहिजेत

मला वाटतं
माझं सगळं अंग आणि डोकं
पाठीच्या ढालीखाली पटकन
लपवता आलं पाहिजे
कासवासारखं

मला वाटतं
माझे सगळे दात
सुळे बनले पाहिजेत
वाघासारखे तीक्ष्ण
आणि नखंही धारदार

मला वाटतं
बिबट्यासारखं लांब झेपा टाकत
मला अचानक दूर निघून
जाता आलं पाहिजे
किंवा झपकन झाडावर चढून
उंच शेंड्यावर बसता आलं पाहिजे

मला वाटतं
मला सापासारखं डसता आलं
पाहिजे जीव जाईल इतकं
किंवा पायाच्या बोटाचा
विषारी चावा कुरतडून
घुशीसारखं बिळात
घुसता आलं पाहिजे

मला वाटतं
कुणाचीच नजर
माझ्यावर पडू नये
मला वाटतं
कुणाचेच हात
माझ्यापर्यंत पोहोचू नयेत.

२. गोष्ट

रात्र गोष्ट सांगते
अंधाराची

गोष्टीत चांदण्या नसतात
चंद्र नसतो
आकाशगंगा नसतात

गोष्टीत असतं
एक कृष्णविवर
सगळी गाणी
त्यात जाऊन पडतात

गोष्ट संपत नाही
दिवसासुद्धा
अंधार भरून राहतो
दिवसासुद्धा
गोष्टीत अंधार
गोष्टीबाहेर अंधार

३. पेपर आणि कात्री 

मी रोज पेपर वाचते
कापून ठेवते बातम्या
किती बलात्कार झाले
किती खून झाले
किती लोक अपघातात
जागच्या जागी मेले
किती आत्महत्या
झाल्या कसकशा

मी रोज पेपर वाचते
कापून ठेवते जाहिराती
श्रद्धांजलीच्या
ज्यांची रोज आठवण
करतात नातेवाईक
ज्यांच्याशिवाय
पोकळी वाटते मित्रांना
ज्यांच्यासाठी आहेत
अश्रू आणि फुले

कापलेले कागद मी
ठेवून देते गादीखाली
खूप प्रेतं प्रेतांवर रचून
ठेवलीत आणि त्यावर
निजतंय अजून एक प्रेत
रोज रात्री

आईला सापडतात कागद
जाळून टाकते
काढून घेते कात्री
तरीही कात्री राहतेच खोलीत
बोटं कात्री जीभ कात्री
अढी घातलेले पाय कात्री
मी आणि आई देखील
एका कात्रीची दोन पाती

मला वाटतं
पृथ्वी आहे सपाट पेपर
मयताच्या बातम्या छापणारा.

४. चालणे 

प्रश्न गेले उडून
उत्तरं गेली बुडून
गप्प बस गप्प बस
काय होणार रडून?

अश्रूचा थेंब खारट
रक्ताचा थेंब खारट
समुद्रात अजून दोन
मिसळले समुद्र खारट

चटचट उचल पाय
चालत ऱ्हाय चालत ऱ्हाय
रस्ता नसो वाट नसो
थांबू नको चालत ऱ्हाय

 

स्वरूपा रावलच्या कविता

जन्मदिनांक : २४  एप्रिल १९७५.

स्वरूपा रावल गुजराथी कवयित्री आहे. ती पूर्णवेळ गृहिणी आहे. वाचन आणि विविध पाककृती बनवणे हे तिचे छंद आहेत. तिचं शिक्षण बी.ए. पर्यंत झालेलं आहे. सध्या वास्तव्य वडोदरा इथे. एका अपघातात गंभीर अपंगत्व आल्यानंतर मिळालेल्या सवडीच्या काळात तिने खूप उशिरा कविता लिहिण्यास सुरुवात केली. तिने स्वत:च हिंदीत अनुवादित केलेल्या कवितांवरून मी हे अनुवाद करते आहे. अनुवाद जसजसा करून होईल तसतशा तिच्या अजून काही कविता इथे देईन.

१. अर्धविधवा

अर्धी विधवा झोया सैरभैर होती आशेने
की सापडेल नवरा सात वर्षांच्या आत

अर्धी विधवा श्यामा गुमसुम गुपचूप
कोमात गेलेल्या नवऱ्याकडे बघत
आणि वीरादेखील कूस बदलत
अर्धांगवायू झालेल्या नवऱ्याची
त्याला बेडसोअर्स होऊ नयेत आणि
थांबावं तिचंही लाखवेळा तळमळत
कूस बदलणं चादर चुरगाळत

अर्धी विधवा जसोदा आहे
पूर्ण कुमारिका अजून
नवरा सोडचिठ्ठी न देताच गेला
पळून देशसेवेच्या बहाण्याने

अर्धी विधवा
ही ती
ती ही
हीही तीही तीही आणि तीही
कितीही न मोजलेल्या अर्धविधवा

हरवलेले, पळून गेलेले,
सोडून गेलेले, अर्धे जिवंत असलेले
पूर्ण मेलेत की नाही माहीत नसलेले
आमचे नवरे
भेकड भेदरट पळपुटे कुणी
नपुंसक निलाजरे कुणी
कुणी धाडसी सीमेवर हरवलेले
कुणी बलवंत आशावादी परतू पाहणारे

अर्धविधवा पाहतात वाट
निकालाची न्यायाची
मोकळ्या होतील बांगड्या फोडून
किंवा कपाळावर झळकवतील
लालबुंद सूर्यबिंब

अर्धविधवांना मिळत नाही न्याय
जरी त्यातल्या एखादीचा नवरा
देशाचा पंतप्रधान बनला तरीही.

२. गुजराथमध्ये

फक्त डोळेच तर फोडलेत ना
त्यात इतकं किंचाळण्यासारखं
काय आहे बाबा?
नाहीतरी गुजराथमध्ये आता तुला
बघण्यासारखं
काय आहे शिल्लक?

हां… काही गोष्टी करता येतील…
जळक्या घराचा वास घेता येईल
नाक कुठे कापलंय तुझं?
नुसत्या बोटांच्या टोकांनी स्पर्श करून
रक्ताचं थारोळं कळेल तुला
त्वचा कुठे सोललीय तुझी?
तुझी सगळी माणसं छाटली
आता रिकाम्या आभाळाखाली
सनसन वाहणारे वारे ऐकता येतील
कान चिरले नाहीत तुझे.

अजून काय करायचं आहे तुला
गुजराथमध्ये?

३. रानफुलं 

तलवारीच्या धारेने
रानफुलं छाटली
पांढरी लाल
जांभळी पिवळी
तरी रक्त नाही आलं
एकाही देठातून
एकही किंकाळी
पाकळीतून
ऐकू आली नाही
म्हणून तुम्ही दु:खी

दु:खी शूरवीरांनो
आता नीट पहा
साध्या दवाने
गंजली आहेत
तुमची पाती
आणि आता
मैदान मारून
परतताना
पुन्हा दिसतील
फुललेली
नवी रानफुलं.

४. लाल मुंगीला समजलं 

एका लाल मुंगीला समजलं
हे मरताहेत सगळे
ती आली हातावर चढून एकाच्या
दंडावरून पुन्हा उतरत गळा
हनुवटीवर येऊन थांबली

मी फक्त पाहिलं तिच्याकडे
आणि तिने माझ्याकडे
पाचोळ्याखाली अजून थोडे किडे
जमले होते

सगळे आप्तस्वकीय
जमले म्हणायचे
शेवटच्या निरोपाला
पण त्यांचा धर्म कोणता
हे आधी विचारलं पाहिजे.